जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधी तंबाखू घेऊन जाणारा एक ट्रक पकडला आहे. या मालाची किंमत सुमारे 10 लाख रुपये इतकी आहे. वरणगावजवळ असलेल्या फुलगाव रेल्वे फाटक परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.
राज्य शासनाने बंदी घातलेला सुगंधी तंबाखू घेऊन एक ट्रक जळगावकडून नागपूरच्या दिशेने जात असल्याची गुप्त माहिती वरणगाव पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी फुलगाव रेल्वे फाटक परिसरात सापळा रचला होता. हा ट्रक त्याठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यात सुमारे 10 लाख रुपये किंमतीचा एक ते दीड क्विंटल सुगंधी तंबाखू आढळला. हा माल कुठून आणला? तो कुठे नेत आहेत? याबाबत ट्रक चालक आणि त्याचा साथीदार उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. ट्रक देखील जप्त करण्यात आला. 18 लाख रुपये किंमतीचा ट्रक आणि 10 लाख रुपये किंमतीचा सुगंधी तंबाखूचा माल, असा सुमारे 28 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
भांड्यांमध्ये लपवला सुगंधी तंबाखू -
पकडलेल्या ट्रकमध्ये भांडी देखील होती. सुगंधी तंबाखू कुणालाही दिसू नये म्हणून भांड्यांमध्ये लपवला होता. पोलिसांनी कसून चौकशी करताना भांडी बाजूला करून सुगंधी तंबाखू बाहेर काढला. दरम्यान, ट्रकमधून प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी ट्रक, माल जप्त करून पोलीस ठाण्यात आणला. त्यानंतर या घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मालाची तपासणी करून तक्रार दाखल केली. त्यानुसार ट्रक, चालक आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वरणगाव पोलीस करत आहेत.