जळगाव - जिल्ह्यात कोरोना पुन्हा एकदा आपले हातपाय पसरत असल्याची स्थिती आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात तब्बल 321 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. गुरुवारी 169, तर शुक्रवारी 152 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांमध्ये हलगर्जीपणा वाढला -
जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, जळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 321 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. समाधानाची बाब म्हणजे 94 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला होता. त्यानंतर मात्र, नागरिकांमध्ये हलगर्जीपणा वाढला. मास्कचा वापर करणे नागरिक टाळत होते. त्याचप्रमाणे बाजारपेठेत उसळलेली गर्दी, लग्नसराई, राजकीय सभा व मेळाव्यांमध्ये होणारी अनियंत्रित गर्दी यासारख्या कारणांमुळे कोरोना पुन्हा एकदा वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज नव्याने समोर आलेल्या 152 रुग्णांमध्ये 95 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणीतून, तर 57 रुग्ण रॅपिड अँटीजन चाचणीतून समोर आले आहेत.
जळगाव शहराची वाटचाल 'हॉटस्पॉट'कडे -
जिल्ह्यात जळगाव शहराची वाटचाल हॉटस्पॉटकडे होत असल्याचे चित्र आहे. शहरात गेल्या दोन दिवसांत तब्बल 163 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यात काल 84, तर आज 79 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. जळगाव शहरासह चाळीसगाव, भुसावळ, अमळनेर या तालुक्यांमध्येही कोरोना वाढत आहे.
अशी आहे रुग्णसंख्येची स्थिती -
जिल्ह्यात सद्यस्थितीत 780 अॅक्टिव रुग्ण आहेत. त्यात 538 रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाही, तर 242 रुग्णांना कोरोनाची लक्षणे आहेत. 780 पैकी 531 रुपये गृह विलगीकरणमध्ये आहेत. तर कोविड केअर सेंटरमध्ये 7, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 167 आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 75 रुग्ण उपचार घेत आहेत.