जळगाव - गणपती विसर्जनासाठी गेलेले तीन तरूण गुळ नदीच्या पाण्यात बुडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील विरवाडे येथे घडली आहे.
मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांसह एका चुलत भावाचा समावेश आहे. सुमित भरतसिंग राजपूत (वय 20), कुणाल भरतसिंग राजपूत (वय 22) तसेच ऋषिकेश रजेसिंग राजपूत (वय 22) अशी मृतांची नावे आहेत. तिघे तरूण हे विरवाडे गावातील रहिवासी आहेत.
गणेश विसर्जनाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे विरवाडे गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेत मृत्यू झालेले सुमित आणि कुणाल हे दोघे सख्खे भाऊ आहेत. तर ऋषिकेश हा त्यांच्या काकांचा मुलगा होता. एकाच कुटुंबातील तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने राजपूत कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आज दुपारच्या सुमारास तिघे जण गणपती विसर्जनासाठी गुळ नदीवर गेलेले होते. गुळ नदीचा प्रवाह असलेल्या निजरदेवजवळ पाण्याचा डोह आहे. जोरदार पाऊस झाल्याने सध्या या डोहात खूप पाणी आहे. गणपती विसर्जनासाठी डोहाच्या पाण्यात उतरल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघे पाण्यात बुडाल्याची माहिती आहे. मात्र, ते पाण्यात नेमके कसे बुडाले? याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.
दरम्यान, तिघे तरूण पाण्यात बुडाल्याचे त्यांच्या सोबत असलेल्या इतर मित्रांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती गावात दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विरवाडे गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. उशिरा तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात प्राथमिक नोंद करण्यात आलेली आहे.