जळगाव - महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकची ताडपत्री ब्लेडने फाडून त्यातील 7 लाख 37 हजार 345 रुपये किंमतीचे खाद्य तेलाचे डबे चोरुन नेणाऱ्या तीन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या तिन्ही आरोपींना पोलिसांनी गुजरात राज्यातील गोध्रा येथून अटक केली.
इद्रीस मोहम्मद कालू (वय 38 वर्षे, रा. मुस्लीम सोसायटी, गोध्रा), मोहम्मद बशीर शेख (वय 35 वर्षे) व शोएब हुसेन जभा (वय 37 वर्षे, दोघे रा. सिंगल फलिया, गोध्रा) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
काय आहे प्रकरण?
23 डिसेंबरला रात्री 7.30 वाजता वरणगाव शहरालगत महामार्गावर एमएच 19 सी वाय 6002 क्रमांकाचा ट्रक उभा होता. या ट्रकमध्ये खाद्य तेलाचे डबे होते. मध्यरात्री चोरट्यांनी ट्रकची ताडपत्री ब्लेडने कापून त्यातील 7 लाख 37 हजार 345 रुपये किंमतीचे खाद्य तेलाचे डबे काढून घेतले. हे डबे चोरट्यांनी आणलेल्या दुसऱ्या ट्रकमध्ये ठेऊन चोरुन नेले होते. 24 डिसेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. यानंतर ट्रकमालकाने दिलेल्या तक्रारीवरुन वरणगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीमा नाक्यांवरून मिळाली माहिती
दरम्यान, अशा प्रकारचे गुन्हे करणारी टोळी गुजरातच्या गोध्रा जिल्ह्यात सक्रीय असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. तसेच पोलिसांनी घटनास्थळाजवळून काही सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले होते. त्यात काही ठाेस माहिती मिळाली नव्हती. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल नाईक, राजेंद्र पाटील, अशरफ शेख, दादाभाऊ पाटील, दीपक पाटील यांच्या पथकाने गुजरात, मध्यप्रदेश सीमांवरील टोलनाक्यांवर तपासणी सुरू केली. यावेळी सेंधवा येथील टोलनाक्यावर काही प्रमाणात माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने गोध्रा जिल्ह्यात तपास सुरू ठेवला होता. अखेर 2 डिसेंबर रोजी या तीनही चोरट्यांना गोध्रा येथून ताब्यात घेण्यात आले.
आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी
आरोपींनी वरणगाव येथील ट्रकमधून खाद्यतेल चोरी केल्याची कबुली दिली आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपासासाठी त्यांना वरणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हेही वाचा - जळगाव : आरोग्य क्षेत्रातील कोरोना योद्धांच्या पाठीवर कौतुकाची थाप
हेही वाचा - जळगाव महापालिकेच्या अतिक्रमण पथकाची धडक कारवाई