जळगाव -जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. शिवाय आता अनलॉकच्या प्रक्रियेत मार्केट, दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आल्याने रस्त्यावर तसेच दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे प्रशासनाने नागरीकांसाठी आता काही निर्बंध लावले आहेत. त्यानुसार कोणी विना मास्क आढळून आल्यास दंड आणि थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, अनेकजण विना मास्क फिरत असतात; तसेच रस्त्यावर थुंकत असतात. अशांसाठी काही निकष लावत आदेश काढण्यात आले आहेत. यात विना मास्क फिरणारे, सोशल डिस्टन्ससिंग पालन न करणाऱ्यांना पाचशे रुपये दंड ठोठावण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहे. त्यासाठी महापालिका, पालिका, जिल्हा परिषद गटात पथके नेमण्याचे आदेश ही काढले आहे.
पथकांची नियुक्ती
जळगाव महापालिका आयुक्तांनी महापालिका कार्यक्षेत्रात वार्ड विभागनिहाय एक अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असलेल्या स्वतंत्र पथकाची नेमणूक करावी. याबाबतच्या नियंत्रण व परिक्षण करण्यासाठी एक नोडल अधिकारी यांची नेमणूक करावी. पथकास दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकारी प्रदान करण्यात यावे. तर उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडेंट कंपनी कमांडर यांनी ग्रामीण भागात जिल्हा परिषद गटनिहाय, नगरपालिका क्षेत्रात वाढ प्रभागनिहाय एक अधिकारी व दोन कर्मचारी यांचा समावेश असलेला स्वतंत्र पथक स्थापन करावा. त्यांनाही दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार प्रदान करावे. पथकाने त्यांच्या कार्यक्षेत्रात जे नागरिक सार्वजनिक, कामाच्या ठिकाणी व वाहतूक प्रवास करताना मास्कचा वापर न करताना आढळून आल्यास पाचशे रुपये दंडाची आकारणी करावी.
‘हे’ करा अन दंड टाळा
- सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, वाहतूक,प्रवास करताना मास्कचा वापर करा.
- कोणत्याही दुकानात, आस्थापनेत एका वेळी पाच पेक्षा जास्त ग्राहक असणार नाहीत याची काळजी घ्या.
- विना मास्क दुकानात आल्यास, दुकानमालकांनी अशा ग्राहकांना वस्तू देऊ नये.
- सर्व दुकान मालक, आस्थापना दुकान मालक, कर्मचारी व ग्राहक यांना मास्कचा वापर बंधनकारक करावा.
- लग्न समारंभासाठी 50 व अत्यंविधीसाठी 20 पेक्षा अधिक व्यक्ती आढळून आल्यास प्रति व्यक्ति 200 रुपये दंड व कायद्यानुसार गुन्हा दाखल होतो. त्यामुळे नियमांचे पालन करा.