जळगाव - राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या परीक्षेतील सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. आज (दि. 31 ऑक्टोबर) पार पडलेल्या गट 'ड' संवर्गातील परीक्षेदरम्यान जळगावात काही परीक्षा केंद्रांवर एकाच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दोन प्रकारचे परीक्षा क्रमांकाचे हॉल तिकीट मिळाले. त्यामुळे नेमक्या कोणत्या परीक्षा क्रमांकावर पेपर द्यावा, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. ऐनवेळी परीक्षा क्रमांक बदलल्याने विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे विद्यार्थी वर्गातून राज्य सरकारच्या भोंगळ कारभाराविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
जळगावात २७ केंद्रांवर झाली परीक्षा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट 'ड' संवर्गाच्या विविध पदांसाठी आज (रविवारी) शहरातील 27 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. मात्र, यात काही उमेदवारांचे परीक्षा केंद्रांवर नंबरच नसल्याने गोंधळ उडाला होता. ऐनवेळी या उमेदवारांचे क्रमांक बदलण्यात आल्याचे समजल्यानंतर त्यांची धावपळ उडाली. बऱ्याच गोंधळानंतर या उमेदवारांना परीक्षेला बसता आले. मात्र, या गोंधळाला जबाबदार कोण..?, असा प्रश्न उपस्थित करत उमेदवारांनी संताप व्यक्त केला.
...अन् उमेदवारांचा जीव पडला भांड्यात
परीक्षा देण्यासाठी यवतमाळ येथून आलेल्या वृषभ मदनराव अवचट या उमेदवाराला ला.ना. शाळेचे केंद्र मिळाले होते. त्याने तीन दिवसांपूर्वी इंटरनेटवरून हॉल तिकिट काढले होते. मात्र, जळगावात परीक्षा केंद्रावर आल्यानंतर या केंद्रावर त्याचा नंबरच नसल्याचे समोर आले. मोठ्या गोंधळानंतर ज्यांच्याकडे या परीक्षेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी होती, त्या मे.न्यासा कंपनीच्या प्रतिनिधींनी या उमेदवाराला नवीन हॉल तिकिट डाऊनलोड करायला सांगितले. परीक्षा सुरू व्हायला अगदी तासाभराचा अवधी असताना या उमेदवाराला त्याचा क्रमांक बदलल्याची माहिती मिळाली. त्यानंतर नवीन हॉल तिकिट डाऊनलोड करण्यासाठी त्याने तातडीने सायबर कॅफेवर धाव घेतली. ते हॉल तिकिट आणल्यानंतर त्याचा क्रमांक केंद्रावर असल्याने त्याला परीक्षेला बसता आले. दुसऱ्या अन्य एका उमेदवारालाही याच परिस्थितीचा सामना करावा लागला. ऐनवेळी हॉल तिकिट बदलल्याची प्रिंट मागण्यात आल्याने त्याचीही तारांबळ उडाली होती. दरम्यान, परीक्षेची संपूर्ण जबाबदारी ही न्यासा कंपनीची आहे. आम्ही केवळ परीक्षा घेत असल्याचे केंद्रावरील प्रमुख अधिकारी प्रसन्नकुमार प्रचंड यांनी सांगितले.
तरुणाचा संताप, म्हणाला राज्य सरकारने उत्तर द्यावे
मी यवतमाळ येथून हजारो रुपये खर्चून जळगावात परीक्षा देण्यासाठी आलो. गेल्या वेळीही याचपद्धतीने आमचे आर्थिक नुकसान झाले होते. आता या प्रकाराला जबाबदार कोण.?, उमेदवारांना थोडा उशीर झाल्यास परीक्षेला बसू दिले जात नाही, अशावेळी यांच्या गोंधळाचा फटका आम्ही तरूणांनी का सहन करावा.?, असा संतप्त सवाल वृषभ अवचट या उमेदवाराने उपस्थित केला.
हे ही वाचा - धक्कादायक : झोपेत असलेल्या पत्नीचा गळा आवळून पतीची आत्महत्या