जळगाव - महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असताना, आता शिवसेनेने देखील सभापतीपदाची निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. सोमवारी (दि. 19 ऑक्टोबर) शिवसेनेकडून नगरसेवक प्रशांत नाईक यांनी उमेदवारी अर्ज घेतला. शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची तयारी देखील असल्याची माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी दिली आहे.
भाजपने देखील आतापर्यंत चार उमेदवारी अर्ज घेतले असले तरी त्यांचा उमेदवार मात्र निश्चित झालेला नाही. ललित कोल्हे, राजेंद्र घुगे-पाटील व नवनाथ दारकुंडे हे तिन्ही नगरसेवक सभापती पदासाठी इच्छुक आहेत. या इच्छुक उमेदवारांनी माजीमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे देखील सभापती पदासाठी आपला दावा केला आहे.
- मंगळवारी निश्चित होऊ शकतो भाजपचा उमेदवार
भाजपकडून तीन उमेदवार इच्छुक असून, माजी मंत्री गिरीश महाजन याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत 21 ऑक्टोबर आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार मंगळवारी (दि. 20 ऑक्टोबर) जाहीर होण्याची शक्यता आहे. महिला बालकल्याण सभापती म्हणून रंजना सपकाळे यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.
- भाजपात ऐनवेळी फुटीची शक्यता
भाजपमध्ये सभापती पदासाठी तीन जणांनी दावा केला असल्याने सभापती निवडीच्या वेळेस भाजपत फूट पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शिवसेनेने बहुमत नसताना देखील निवडणूक लढण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपच्या फुटीचा फायदा घेण्याची तयारी शिवसेनेने केली असली तरी शिवसेनेकडे स्थायी समितीत पूर्ण बहुमत नाही. ऐनवेळी काही चमत्कार झाला तर शिवसेना उमेदवाराला संधी मिळू शकते.
- स्थायी समितीमधील पक्षीय बलाबल असे
भाजप - 12
शिवसेना - 3
एमआयएम - 1
हेही वाचा - भाजपने आधीच्या कर्जमाफीचा हिशेब द्यावा, मग मुख्यमंत्र्यांवर टीका करावी - गुलाबराव पाटील