जळगाव - आमच्या पक्षात बाहेरुन येणाऱ्यांना न्याय मिळतो, मी तर पक्षात जन्मलोय. त्यामुळे अजूनही मला पक्षाकडून न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. हाडा-मासाच्या, रक्ताच्या माणसाला पक्ष दूर लोटणार नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली. तसेच आता मी माझे म्हणणे केंद्रीय तसेच राज्याच्या पक्षश्रेष्ठींपुढे मांडणार आहे. ते सांगतील त्याप्रमाणे पुढील दिशा ठरवणार असल्याचे ते म्हणाले.
दिवाळी पाडव्यानिमित्त जळगावातील 'मुक्ताई' या निवासस्थानी एकनाथ खडसेंनी सोमवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी खडसेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मात्र, काही विषयांवर त्यांनी स्पष्टपणे बोलणे टाळून सस्पेन्स कायम ठेवला. लहान बाळ जन्मला यावे तसे मी या पक्षात जन्मला आलो आहे. एकीकडे दत्तक किंवा सावत्र पूत्र घेऊन त्यांना न्याय दिला जात असेल तर माझ्यावर अन्याय करण्याचे कारण नाहीच. मला न्याय मिळेलच, अशी आशा करायला काय हरकत नसल्याचे खडसे म्हणाले.
नेहमी पक्षाच्या भूमिकेशी सहमतच राहिलो-
पक्ष सुदृढ आणि चांगला राहिला पाहिजे, म्हणून मी नेहमी पक्षाच्या भूमिकेशी सहमत राहिलो आहे. आजवर पक्षाविषयी माझ्या मनात कधीही वाईट चित्र आलेले नाही. तसे वाईट चित्र माझ्या मनात आले असते तर ते माझ्या कृतीतून दिसलेच असते, असेही खडसे म्हणाले.
आता मी माझे म्हणणे केंद्रीय तसेच राज्याच्या पक्षश्रेष्ठींपुढे मांडणार आहे. त्यानंतर आता पुढे मी काय करायचे? अशी विचारणा करणार आहे. पक्षश्रेष्ठी सांगतील, त्याप्रमाणे मी माझी पुढील दिशा ठरवणार आहे. दरम्यान, या चर्चेवेळी खडसेंनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.