जळगाव - मागील 10 दिवस मनोभावे आराधना केल्यानंतर मंगळवारी (1 सप्टें) अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी महापालिका प्रशासनाने विसर्जनाच्या दिवशी एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून शहरात 28 ठिकाणी घरगुती गणेशमूर्ती संकलनासाठी स्टॉल्स उभारले आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाकडून देखील मोठ्या गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी घरगुती मूर्ती संकलन केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी होणार आहे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुका काढण्यात येणार नाही. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने गणेश विसर्जनाबाबत महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने काही मार्गदर्शक तत्त्वे आखली आहेत. त्यानुसार महापालिकेने उभारलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर गर्दी होऊ नये, यासाठी शहरातील प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी देखील गणेश मूर्ती संकलन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या ठिकाणी घरगुती गणेशमूर्ती संकलित केल्या जाणार आहेत. सकाळी 9 वाजेपासून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. विसर्जन रथात केवळ मोजकेच कार्यकर्ते उपस्थित असतील, याबाबत प्रत्येक गणेश मंडळाने खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावर्षी गणेशोत्सव जसा शिस्तबद्ध पद्धतीने व भावभक्तीने साजरा झाला; त्याच पद्धतीने विसर्जन प्रक्रिया देखील पार पडावी, यासाठी महापालिका प्रशासनासह जिल्हा प्रशासन लक्ष देऊन आहे. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची या कामी मदत घेण्यात येणार आहे. गणपती बाप्पाचे विधीवत विसर्जन होईल, याकडे गणरक्षक त्याचप्रमाणे बजरंग दलाचे कार्यकर्ते नजर ठेवणार आहेत. नागरिकांनीदेखील प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
12 तासांपर्यंत यंत्रणा असेल दक्ष
विसर्जनाच्या दिवशी प्रशासनाची यंत्रणा 12 तासांपर्यंत दक्ष असणार आहे. दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे नेमलेले गणरक्षक हे विसर्जन मिरवणुकीचे संचलन करतात. मात्र, यावर्षी मिरवणुका नसल्याने हेच गणरक्षक त्याचप्रमाणे बजरंग दलाचे कार्यकर्ते मेहरूण तलावाच्या ठिकाणी गणेश घाटावर सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहेत. विसर्जन विधीवत पद्धतीने होईल, याकडे त्यांचे लक्ष राहणार आहे. 100 पेक्षा जास्त गणरक्षक मेहरूण तलावाच्या ठिकाणी तैनात असणार आहेत.
जीवरक्षक यंत्रणाही सज्ज
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी मेहरूण तलावावर जीवरक्षक यंत्रणादेखील महापालिकेच्यावतीने सज्ज ठेवण्यात आलेली आहे. विसर्जनाच्या दिवशी पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त असणार आहे.
हेही वाचा - मुसळधार पावसामुळे वाघूर नदीला पूर, धरणाचे दोन दरवाजे उघडले