जळगाव - शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, सातबारा कोरा करत त्यांना चिंतामुक्त करू, अशा घोषणा देणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे, असा टिका माजीमंत्री गिरीश महाजन यांनी आज (सोमवारी) येथे केली. तसेच शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणे तर सोडाच पण साधा शेतीमाल देखील सरकारला हमीभावात खरेदी करता आलेला नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
गिरीश महाजन सोमवारी दुपारी येथे आले होते. त्यांच्या जीएम फाउंडेशन संपर्क कार्यालयात त्यांनी 'ईटीव्ही- भारत'शी संवाद साधला. यावेळी महाजन यांनी कोरोनामुळे राज्यात उद्भवलेली आणीबाणीची परिस्थिती, शेतमाल खरेदीचे त्रांगडे या मुद्यांवर आपली मते मांडली.
ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला राज्य सरकारला वेळ नाही. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू, अशा घोषणा देणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. कापूस, मका, हरभरा खरेदीचा विषय गंभीर झाला आहे. यंदाचे हे असे पहिले वर्ष आहे, ज्यावर्षी जूनपर्यंत शेतकऱ्यांचा कापूस विक्री झालेला नाही. शासकीय खरेदीत सुसूत्रता नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने हमीभावापेक्षा 1200 ते 1400 रुपये कमी दराने आपला कापूस विकावा लागत आहे.
गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला. त्यानंतर रब्बीत पिकलेल्या शेतमालाच्या विक्रीचा प्रश्न निर्माण झालाय. शेतमाल विक्रीतील अडचणी दूर करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. किंबहुना सरकार उदासीन दिसत आहे. केंद्र सरकारने शेतमाल खरेदीची हमी देऊनही राज्य सरकार शेतमाल खरेदी करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करूच नये, अशा स्वरुपाच्या मौखिक सूचना सरकारने काढल्या आहेत काय? अशी शंका येत आहे. पेरण्या तोंडावर आलेल्या असताना राज्य सरकार पावले उचलत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.
कोरोनाचा परिस्थिती हाताळण्यात सरकारला अपयश -
राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या कामी सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. कोरोना चाचणीचे अहवाल उशिरा येत असल्याने लोकांना कळतच नाही की आपल्याला कोरोना झालाय किंवा नाही. तोपर्यंत पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने इतरांना लागण होत आहे.
राज्य सरकारने उपाययोजना करण्याची गरज आहे. सरकारने चाचण्या वाढवल्या पाहिजेत. पण याबाबतीत सरकारचे कोणतेही नियोजन दिसत नाही. आता पावसाळ्याला सुरुवात होईल. तेव्हा आपल्या कल्पनेच्या बाहेर रुग्णसंख्या वाढेल. परिस्थिती अजून बिकट होण्याची भीती आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांवर होणारा उपचार, त्यांच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत सरकार अपयशी ठरल्यानेच रुग्ण पळून जाण्याच्या घटना घडत आहेत, असा आरोपही यावेळी गिरीश महाजन यांनी केला.