जळगाव - जिल्ह्यातील कोरोना कहर थांबता थांबत नसल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुवारी जळगावात कोरोनाचा दहावा बळी गेला. अमळनेर शहरातील एका ६५ वर्षीय कोरोनाबाधित वृद्धाचा मृत्यू झाला आहे. हा जिल्ह्यातील दहावा तर कोरोना हॉटस्पॉट असलेल्या अमळनेर शहरातील सहावा बळी ठरला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.
अमळनेर येथील कोरोनाबाधित ६५ वर्षीय वृद्धाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी २च्या सुमारास घडली. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या आता दहावर पोहचली आहे. दरम्यान, २९ तारखेला ५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे जिल्ह्याला थोडाफार दिलासा मिळेल, असे वाटत असतानाच गुरुवारी दुपारी एका बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
हृदयरोगाने होता त्रस्त -
जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेला कोरोनाबाधित रुग्ण हा आधीपासूनच हृदयरोगाने त्रस्त होता. त्याला कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने २५ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. हा रुग्ण अमळनेरमधील आधीच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. उपचार सुरू असताना आज दुपारी त्याचा मृत्यू झाला आहे.