जळगाव - जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्याची सुरुवात होताच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मार्च महिन्याच्या पहील्याच दोन दिवसात कमाल तापमानाचा पारा ३९ अंशावर जावून पोहचला आहे. दुपारी उन्हाचे चटके हैराण करीत असले तरी पहाटे वाजणारी थंडी अद्याप कायम आहे.
तापमानात ४ ते ५ अंशाची वाढ-
जळगाव जिल्हा हा अधिक तापमानासाठी प्रसिध्द आहे. यंदा तर मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याची चाहुल जळगावकरांना लागली आहे. यंदाचा हिवाळा जळगावकरांना तसा जाणवलाच नाही. केवळ फेब्रुवारी महीन्याच्या पहिल्या तीन आठवड्यातच थंडीची हुडहुडी जाणवली. एकीकडे थंडी कमी होत असतांनाच कमाल तापमानात वाढ होत असल्याने उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. गेल्या चार ते पाच दिवसात तापमानात ४ ते ५ अंशाची वाढ झाली असून यंदा मार्च महिन्याचा पहिल्या आठवड्यातच पारा ३९ अंशावर पोहचला आहे.
पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता-
यंदा तापमानवाढीसह सातत्याने अवकाळी पावसाच्या संकटाला देखील शेतकऱ्यांना अनेकवेळा तोंड द्यावे लागले आहे. जिल्ह्यात यंदा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या हिवाळ्यातील चारही महिन्यात अवकाळी पाऊस झाला. आता मार्च महिन्यात देखील पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.