जळगाव - बोदवड तालुक्यात असलेल्या जामठी येथे सोमवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी टाटा इंडिकॅशचे एटीएम फोडले. मंगळवारी सकाळी 7 वाजता ही घटना उजेडात आली. दरम्यान, जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र वाढले असून दररोज कुठे ना कुठे चोरीच्या घटना समोर येत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जामठी येथे शर्माजी कॉप्लेक्समध्ये टाटा इंडिकॅशचे एटीएम आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी हे एटीएम फोडले आणि एटीएम मशीन उखडून टाकत नासधूस देखील केली आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळी 7 च्या सुमारास समोर आला. गावातील काही ग्रामस्थांना एटीएम मशीन उखडून टाकलेले दिसून आले. चोरी झाल्याची खात्री होताच घटनेची माहिती बोदवड पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, उशिरापर्यंत बँकेचे अधिकारी दाखल न झाल्याने एटीएम मशिनमधून नेमकी किती रक्कम चोरीला गेली? हे स्पष्ट होऊ शकले नाही.
हेही वाचा - 'आज के शिवाजी...' वादग्रस्त पुस्तकाचे जळगावातही पडसाद; काँग्रेस-राष्ट्रवादीने केली निदर्शने
घटनास्थळीच घुटमळले श्वानपथक -
चोरट्यांचा तपास लावण्यासाठी पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. मात्र, श्वानपथक घटनास्थळाजवळच घुटमळल्याने पोलिसांना धागेदोरे मिळू शकले नाहीत. एटीएम मशीन फोडल्यानंतर चोरटे वाहनाद्वारे पसार झाले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, जामठीतील शर्माजी कॉप्लेक्स हे भरवस्तीत आहे. अशा ठिकाणी चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्र गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा - अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईचा दिखावा; ट्रॅक्टर अपघातानंतर महसूलासह पोलीस यंत्रणेला जाग