जळगाव - तरसोद ते फागणे दरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला पूर्ण क्षमतेने अद्याप सुरुवात झालेली नाही. या महामार्गावर काही ठिकाणी काम झाल्याचा दावा आग्रोह इन्फ्रास्ट्रक्चरने केला असला, तरी तरसोदपासूनच्या कामाला विविध परवानगी अभावी ‘ब्रेक’ बसला आहे.
आग्रोह इन्फ्रास्ट्रक्चरला तरसोद ते फागणे कामाचे कंत्राट मिळाले आहे. काम लवकर पूर्ण होण्यासाठी या कंत्राटदाराने काही ठिकाणी सब-कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. तरसोद ते असोदा रेल्वे गेटदरम्यान चार ते पाच किलोमीटरचे काम नाशिक येथील व्ही. डी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चरला दिले आहे. या कंपनीचे कामगार, इंजिनिअर असे २० जण जुलै महिन्यापासून काम करण्यासाठी दाखल झाले. तसेच मुरूम, खडी इतर साहित्य वाहून नेण्यासाठी दहा डंपर, क्रेन, रोडरोलरही दाखल झाले. पाटील इन्फ्रास्ट्रक्चरने आत्तापर्यंत ज्या मार्गाचे चौपदरीकरण केले तेथे चार फूट खोदून त्याठिकाणी मुरूम टाकण्याचे काम सुरू केले. मात्र मुरूम उचलण्याची तसेच या मार्गात येणारे मोठे वृक्ष तोडण्याची परवानगी मूळ कंत्राटदाराने दिलेली नाही. मार्गाच्या कामात तरसोद बस थांबा, विजेचे पोल, एमआयडीसीची जलवाहिनी हे सर्व काम करताना अडचणीचे ठरत आहे. वृक्ष तोडल्याशिवाय, बस थांबा हटविल्याशिवाय आणि विजेचे पोल हटविल्याशिवाय महामार्गाची मूलभूत कामे करता येणार नाही. आमच्या कडे सर्व साधने आहेत, मात्र परवानगी नसल्याने आम्ही कामाविना बसलो असल्याचे पाटील इन्फ्रास्ट्रक्चरच्या अभियंत्यांनी सांगितले.