जळगाव - सर्वात जाडी कातडी असलेला प्राणी कोणता असेल तर तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे वित्त व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विरोधकांवर जळगावात केली.
रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ जावळे यांनी गेल्या ५ वर्षात केलेल्या विकासकामांचा आढावा घेणाऱ्या 'बांधिलकी' या पुस्तिकेचे प्रकाशन तसेच रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील सावदा येथे आयोजित बुथ कार्यकर्ता मेळाव्यासाठी सुधीर मुनगंटीवार जळगाव दौऱ्यावर आले होते. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मुनगंटीवार यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ते पुढे म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ४७ वर्षे २ महिने आणि १ दिवस राज्याची सत्ता उपभोगली. मात्र, त्यांनी सत्तेचा उपयोग मस्तीसाठी तसेच स्वार्थासाठी केला. सत्तेचा उपयोग त्यांनी स्वतःची घरे भरण्यासाठी तसेच नातेवाईकांसाठी केला. म्हणूनच आज त्यांच्यावर ही वेळ आली आहे.
एवढे वर्षे सत्तेत असताना यांचा दिवा कधी पेटला नाही. पण आम्ही सत्तेत आल्यानंतर विकासकामे करायला सुरुवात केली. ही विकासकामे पाहून यांच्या पोटात दुखायला लागले. आता यांची पोटदुखी थांबवण्यासाठी आम्हाला पोटदुखी योजना आणावी लागणार आहे, असा चिमटा देखील मुनगंटीवार यांनी यावेळी काढला.
...तर यांच्यावर ही वेळ आली नसती
सर्वात जाड कातडी असलेला प्राणी कोणता? असा प्रश्न जर २५ वर्षांपूर्वी कोणी एखाद्या विद्यार्थ्याला केला तर तो विद्यार्थी 'गेंडा' असे उत्तर द्यायचा. पण आज जर चौथी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला हाच प्रश्न केला तर तो विद्यार्थी 'काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस', असे उत्तर देईल. सत्ता असताना यांनी कधी गोरगरिबांचा विचार केला नाही. सत्तेचा उपयोग यांनी सर्वसामान्य, गोरगरीबांच्या उद्धारासाठी केला असता तर आज ही वेळ यांच्यावर आली नसती. आपल्या राज्यात काय नव्हते? नद्यांमध्ये पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. पण विरोधकांकडे इच्छाशक्ती नसल्याने राज्यात सिंचन होऊ शकले नाही, असा आरोपही मुनगंटीवार यांनी केला.
वर्षानुवर्षे गप्प असणारे आता पोपटासारखे बोलू लागलेत
एक हजार पोपट मेल्यावर त्यांचा आत्मा विचारणा करायला यावा, असे हे विरोधक आता पोपटासारखे बोलू लागले आहेत. शेतकऱ्यांसाठी भाजपने काय केले? अशी विचारणा विरोधक करत आहेत. मात्र, जनतेने ४७ वर्षे सत्ता दिली. मते फेकून मारली. पण विरोधकांनी गोरगरीब जनता आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. यांची जेव्हा सत्ता यायची तेव्हा यांचा प्रत्येक नेता लाल दिव्याच्या गाडीसाठी मरून पडायचा. पण, आमची जेव्हा केंद्रात, राज्यात सत्ता आली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र्यांच्या गाडीचा लाल दिवा काढण्याचा शासन आदेश काढला. ही सत्ता लाल दिव्याच्या गाडीसाठी नाही तर सर्वसामान्य जनतेसाठी असल्याचे मोदींनी जाहीर केले. बाकीचे सारे पक्ष हे एखाद्या नेत्याच्या परिवाराची खासगी संपत्ती आहेत. पण भाजप हा पक्ष नोंदणी करावी लागते म्हणून पार्टी आहे. अन्यथा भाजपचे नाव म्हणजे 'भारतीय जनता परिवार' असे राहिले असते, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - शरद पवारांचा सल्ला आम्ही जनतेच्या हितासाठीच घेतो - सुधीर मुनगंटीवार
या मेळाव्यात आमदार हरिभाऊ जावळे यांनी गेल्या ५ वर्षात केलेल्या विकासकामांचा आढावा घेणाऱ्या 'बांधिलकी' या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे, सुभाष भामरे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर आदी उपस्थित होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. लोकसभा निवडणुकीत प्रश्न वेगळे होते. पण, आता विधानसभा निवडणुकीत प्रश्न वेगळे आहेत. गाफील राहून चालणार नाही, असे आवाहन एकनाथ खडसेंनी केले.