जळगाव : खान्देशचा विकास होत नसल्याने महाराष्ट्रातून खान्देशला वेगळे करण्याची आवश्यकता असल्याचे विधान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले. खान्देशातील प्रकल्प सातत्याने इतरत्र हलवले जात असतील. सरकारकडून सातत्याने खान्देशवर अन्याय होत असेल, तर महाराष्ट्रातून खान्देशला वेगळे करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. एकनाथ खडसे हे जळगावमधील पत्रकार परिषेदत बोलत होते.
विकास नाही तर खान्देशला करा वेगळे : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांनी सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी खान्देशला वेगळे करण्याची गरज असल्याचे विधान केले. जर विकास होत नसेल तर महाराष्ट्रातून खान्देश वेगळे केले गेले पाहिजे, असे विधान खडसे यांनी केले. या पत्रकार परिषदेत सरकारच्या कारभारावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. चार महिन्यात २२ वेळा अवैध धंद्यांबाबत आय जी, यांच्यासह मंत्र्यांकडे तक्रारी माझ्या सारखा माणूस तक्रार करतो. मात्र कोणताही उपयोग झाला नाही. सरकारचाच याला उघड उघड पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. अधिवेशनात प्रश्न मांडल्यानंतरही या निगरगठ्ठ सरकारने आतापर्यंत कारवाई केलेली नाही.
लगेच घेतला यु-टर्न : जळगावमधील प्रकल्प होत नाहीत. खान्देशचा विकास रखडला आहे. सातत्याने अन्याय होत आहे. त्यामुळे इच्छा नसतानाही खान्देश महाराष्ट्रपासून वेगळा करावा,असे म्हणावे लागत असल्याचे सांगत त्यांनी आपल्या विधानाचे स्पष्टीकरण दिले. खान्देशातील प्रकल्प इतरत्र वळविले जात आहेत. हा उत्तर महाराष्ट्रावरही मोठा अन्याय आहे. खान्देश हा राज्यातला स्वतंत्र भाग आहे, त्याच्या विकासासाठी निधी पाहिजे. त्या प्रमाणात स्वतंत्र तरतूद केली पाहिजे, त्याकडे राज्याचा एक भाग म्हणून बघितले पाहिजे, असेही खडसे म्हणालेत.
मतदारसंघातील वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र पाठोपाठ आता, पशु वैद्यकीय महाविद्यालय शासनाने दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केले आहे. मात्र जिल्ह्यातले मंत्री निमूटपणे त्याकडे पाहत आहे, मी एकटाच बोलतो पण सरकारकडून कुठलीही कारवाई होत नाही - एकनाथ खडसे
मोठ्याने बोलणाऱ्या नेत्यांनी प्रकल्प आणावेत : विकासच जर थांबला असेल आणि सातत्याने खान्देशावर अन्याय होत असेल तर मग कुणाकडे बघावे. सत्तेत असलेले मंत्री नेहमी मुख्यमंत्र्यांच्या जवळ असतात. उपमुख्यमंत्री त्यांच्या जवळचे आहेत, असे सांगणारे गिरीश महाजन असतील किंवा मंत्री गुलाबराव पाटील असतील यांनी त्यांची प्रतिष्ठापना लावावी. जे जळगावच्या विकासाचे प्रकल्प आहेत ते पुन्हा खान्देशात आणावेत, असेही एकनाथ खडसे म्हणालेत. सरकारमधील मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील जेवढ्या मोठ्याने बोलतात, त्याचपद्धतीने प्रकल्प पुन्हा खान्देशात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. विकास करण्यासाठी वेग दिला पाहिजे, अशी टीका यावेळी खडसेंनी केली. आपल्या मतदारसंघाचा विकास व्हावा, यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न करतात. त्या पध्दतीने जिल्हा, खान्देश तसेच उत्तर महाराष्ट्राचा विकास व्हावा, यासाठी प्रयत्न करावेत, असा टोला एकनाथ खडसेंनी मंत्री गिरीश महाजन यांना लगावला.
हेही वाचा -