जळगाव - राज्य परिवहन महामंडळात वाहक पदावर कार्यरत असलेल्या मनोज चौधरी यांनी आज (सोमवारी) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. तीन महिन्यांपासून त्यांचे पगार झालेले नव्हते. त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या मनोज चौधरी यांनी टोकाचा निर्णय घेत जीवनयात्रा संपवली.
मनोज चौधरी यांनी दोन वर्षांपूर्वी कुसुंबा गावातील घरावर दुसरा मजला बांधण्यासाठी एका खासगी पतसंस्थेतून सात लाख रुपये कर्ज घेतले होते. यातील दोन लाख रुपये त्यांनी नियमित फेडले. तर आता पगार होत नसल्याने कर्जाचे हप्ते थकले होते. दुसरीकडे थकीत हप्त्यांवर मोठ्या प्रमाणात दंड देखील वाढत होता. अशात नियमित ड्युटीदेखील मिळत नव्हती. एकाच वेळी चहुबाजूंनी आलेले संकट आणि आर्थिक विवंचना यामुळे निराश झालेल्या मनोज यांची टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. कर्ज काढून बांधकाम केलेल्या घराच्या खोलीतच आत्महत्या करण्याची दुर्देवी वेळ त्यांच्यावर आली.
कोरोनामुळे बिघडले एसटीचे आर्थिक गणित -
कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन पाळण्यात आला. यावेळी एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. नंतर टप्प्या-टप्प्याने प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, एसटीचे बिघडलेले आर्थिक गणित अजून सुरळीत झालेले नाही. आधीच आर्थिक गर्तेत सापडलेल्या एसटीला बंद काळात कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागते. यात सर्वात जास्त परिणाम कर्मचाऱ्यांना भोगावे लागत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना पगार मिळालेले नाहीत. त्याआधी देखील अनियमितता होती. यामुळे कर्मचारी हातउसनवारी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
हेही वाचा - एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; ठाकरे सरकारला धरले जबाबदार
चौधरी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर -
नियमित पगार होत नसल्याने एसटीचे अनेक कर्मचारी कर्जबाजारी झाले आहेत. अशीच अवस्था मनोज यांची झाली होती. लॉकडाऊनमध्ये खराब झालेली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी चौधरी कुटुंबीय कष्ट करीत होते. मृत मनोज यांचा लहान भाऊ फोटोग्राफीचे काम करतो. वडील टेलरिंगचे काम करीत आहेत. त्यांच्या पत्नी ऐश्वर्या यादेखील नवीन साडी विक्रीचा व्यवसाय करीत होत्या. विस्कटलेली आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या प्रयत्नात हे कुटुंब होते. अशात मनोज यांनी मात्र टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. त्यामुळे चौधरी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ड्युटीचा होता त्रास -
मृत मनोज यांचे भाऊ सागर व वडील अनिल चौधरी यांनी रुग्णालयात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, मनोज हा आठ वर्षापासून एस. टी. महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होता. सुरुवातील मुक्ताईनगर येथे त्यांची ड्युटी होती. त्यानंतर जळगाव आगारात बदली झाली. मनोज याची ड्युटी सतत लांब पल्ल्याच्या गाड्यांवर लावली जात होती. तो अनेकांची ड्युटी विभागून घेत होता, मात्र त्याची वेळ यायची तेव्हा त्याला कोणीच सहकारी मदत करीत नव्हते. त्यात तीन महिन्यांपासून पगार नाही. झाला तर वेळेवर होत नाही. त्यात कमी पगार, अनियमतता. यामुळे मनोज कर्जबाजारी झाला होता. सरकारचा कारभार याला कारणीभूत आहे, हे त्यांनी चिठ्ठीतच लिहीले आहे. माझा भाऊ गेला, त्याला कोण परत आणून देणार, असे म्हणत भाऊ सागर आक्रोश करीत होता. तर आमचे नुकसान झाले तसे इतरांचे होऊ नये. शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा, असे त्यांचे वडील अनिल चौधरी यांनी सांगितले.
माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांनी रुग्णालयात येऊन मनोज यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.