जळगाव - जिल्हा रुग्णालयात रुणसेवा करत असलेल्या काही परिचारिकांना रहिवासी सोसायटीमधून निघून जा, असा तगादा लावल्याचा संतापजनक प्रकार जळगावात घडला. या परिचारिकांनी मंगळवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सोसायटी अध्यक्षाची तक्रार केली आहे.
दीक्षितवाडी परिसरातील वानखेडे सोसायटीमध्ये हा गंभीर प्रकार घडला आहे. या साेसायटीमध्ये सुमारे २० कुटुंब हे वैद्यकीय सेवेशी संबंधित आहेत. यातील काही कुटुंबातील महिला परिचारिका असून त्या सध्या जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा करीत आहेत. देशात सध्या कोरोनामुळे आपत्कालीन परिस्थिती असून डॉक्टर, परिचारिका, पोलीस तसेच शासकीय कर्मचारी जीव मुठीत घेऊन आपले कर्तव्य बजावत आहेत. तर दुसरीकडे वानखेडे सोसायटीचे अध्यक्ष दीपक नेटके यांनी थेट पारिचारिकांना 'हा परिसर सोडून निघून जा' असा तगादा लावला आहे. अनेक दिवसांपासून ते सातत्याने परिचारिकांना निघून जाण्यासाठी त्रास देत आहेत. अखेर या परिचारिकांनी मंगळवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली.
पोलिसांनी दिली समज-
परिचारिकांच्या तक्रारीनंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अकबर पटेल यांनी दीपक नेटके यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. नेटके याने केलेला प्रकार अत्यंत लज्जास्पद व संतापजनक असल्याची त्याला जाणीव करून दिली. तसेच रुग्णसेवा करत असलेल्या परिचारिकांसोबत सौजन्याने वागण्याची तंबी त्यांना देण्यात आली. तसेच नोटीस देऊन समज देण्यात आली आहे.