जळगाव - जिल्ह्यात कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत असतानाच नागरिकांच्या लसीकरणासही वेग देण्यात आला आहे. जिल्ह्यात कालपर्यंत 1 लाख 95 हजार 214 नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस, तर 22 हजार 854 नागरिकांनी दुसरा डोस घेतला.
हेही वाचा - चिंताजनक..जळगावात एकाच दिवशी कोरोनाचे 21 बळी; 984 नवे बाधित
जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय प्रारंभ करण्यात आला होता. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या सत्रात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरू केले. त्यानंतर 5 फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स आणि 45 वर्षांवरील कोमॉर्बिड व्यक्ती, तसेच जेष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले होते. 1 एप्रिलपासून जिल्ह्यातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले असून, जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांसह काही खासगी रुग्णालये, असे एकूण 133 लसीकरण केंद्रांवर नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन व जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन नागरिकही स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी पुढे येत आहेत.
लसीकरण केंद्र वाढविण्याचा प्रशासनाचा विचार
कोरोना लसीकरणास नागरिकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे शासनाकडे मोठ्या प्रमाणात लसीची मागणी नोंदविली होती. त्यानुसार जिल्ह्याला नुकतेच 40 हजार लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार लसीकरण केंद्रही वाढविण्याचा प्रशासनाचा विचार आहे. लसीकरण केंद्र वाढली तर नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे होणार आहे.
अशी आहे आकडेवारी
जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 95 हजार 214 नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस, तर 22 हजार 854 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 23 हजार 840 हेल्थ केअर वर्कर्सनी पहिला व 11 हजार 336 व्यक्तींनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. तर, 18 हजार 771 फ्रंटलाईन वर्कर्सनी पहिला व 5 हजार 850 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. त्याचबरोबर, 45 वर्षांवरील 1 लाख 52 हजार 603 नागरिकांनी पहिला व 5 हजार 668 नागरिकांनी दुसरा डोस घेतला असल्याची आकडेवारी कोविन पोर्टलवर देण्यात आली आहे.
हेही वाचा - जळगाव जिल्ह्यात प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या, त्याच दिवशी होता साखरपुडा