जळगाव - मनपा बांधकाम विभागाअंतर्गत शहरात सुरू असलेले कामे अत्यंत सुमार दर्जाचे आहेत. अनेक कामे पूर्ण होत नसल्याने शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी सोमवारी मनपाच्या 9 व्या मजल्यावरील बांधकाम विभागाचा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन पुकारले. सागर पार्क मैदानाचे अपूर्ण काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन मिळावे, अशी त्यांनी मागणी केली आहे. हे आश्वासन पूर्ण होईपर्यंत दररोज बांधकाम विभागात समोर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा अनंत जोशी यांनी दिला.
महापालिकेचे अनेक घोळ समोर येत आहेत. शहरात सुरू असलेल्या कामांमध्ये बांधकाम विभागाकडून मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. सागर पार्क मैदान सुशोभित करण्याबाबत गेल्या वर्षभरापूर्वी कामाला सुरुवात झाली होती. मात्र संरक्षक भिंत तयार केल्यानंतर या ठिकाणचे काम अपूर्ण अवस्थेत ठेवण्यात आले आहे. याबाबत शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी मनपा बांधकाम विभागाला निवेदन देत कामाला सुरुवात करण्याची मागणी केली होती. मात्र महापालिकेने अद्यापही या कामाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे अनंत जोशी यांनी सोमवारपासून बांधकाम विभागात समोर आंदोलनाला सुरुवात केली आहे.
सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला शिवसेनेचे मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, नगरसेवक प्रशांत नाईक, माजी नगरसेवक नितीन सपके यांनीही जोशी यांच्या आंदोलनाला साथ देत आंदोलनात सहभागी झाले.
-कार्यादेश देऊनही कामांना होत नाही सुरुवात
अनंत जोशी म्हणाले की, सागर पार्क मैदानाच्या कामासह शहरातील अनेक कामे हे कार्यादेश देऊनही अद्यापपर्यंत सुरू झालेले नाहीत. तसेच सुरू असलेल्या कामांची गुणवत्तादेखील चांगली नाही. घनकचरा प्रकल्पाचा प्रश्नदेखील बांधकाम विभागाला सोडविता आलेला नाही. सागर पार्क मैदानासाठी 70 लाखांचा निधी मंजूर झाला होता. मुळात हे काम सहा महिने उशिराने सुरु झाले होते. त्यातही ठेकेदाराने हे काम अपूर्ण सोडले आहे. सागर पार्क परिसरात लाईट नाही. तसेच जॉगिंग ट्रॅकदेखील काम सुरू झालेले नाही. याबाबत अनेक वेळा सूचना देऊनही महापालिकेने लक्ष दिले नाही. त्यामुळे महापालिकेचा भोंगळ कारभाराविरोधात आंदोलन पुकारले आहे.