जळगाव- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी शिवसेनेच्या वतीने 'जनआशीर्वाद यात्रा' काढण्यात येणार आहे. या यात्रेचे यजमानपद जळगाव जिल्ह्याला देण्यात आले आहे. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे १८ जुलैला जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगावातून 'जनआशीर्वाद' यात्रेला प्रारंभ होणार आहे.
आदित्य ठाकरे यांच्या संभाव्य दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी रविवारी दुपारी जळगावातील केमिस्ट भवनात शिवसेना तसेच युवासेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत आदित्य ठाकरे यांचा दौरा यशस्वी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या दौऱ्याला जळगाव जिल्ह्यापासून सुरूवात होत आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असून दौऱ्याच्या नियोजनात कुठेही कमी पडता कामा नये. या दौऱ्यात आदित्य ठाकरे हे विद्यार्थी, शेतकरी, महिलावर्गाची भेट घेणार असून त्यांना भेडसावणाऱ्या अडीअडचणी जाणून घेणार आहे. त्यामुळे सेना पदाधिकाऱ्यांनी दौऱ्याचे अचूक नियोजन करावे, असे भावनिक आवाहन नेत्यांनी केले आहे.
या बैठकीला सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, आमदार किशोर पाटील, चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार चिमणराव पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.