जळगाव - शिवसेनेच्या वतीने आज (शुक्रवारी) जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इंधन दरवाढीविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. गॅस सिलिंडरसह पेट्रोल व डिझेलने भरलेल्या बाटल्या पाळण्यात टाकून 'पाळणा गीत' म्हणत इंधनदरवाढीचा निषेध करण्यात आला. आश्वासन देवून देखील इंधनदरवाढ कमी न करणाऱ्या केंद्र सरकारच्या बालिश बुद्धीविरोधात हे अनोखे आंदोलन असल्याची माहिती शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी यावेळी दिली. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला.
राज्यभरात शिवसेनेकडून गॅस, पेट्रोल व डिझेल इंधन दरवाढीविरोधात आज (शुक्रवारी) आंदोलन करण्यात आले. या अनुषंगाने जळगाव शहरात देखील शिवसेना महानगर व महिला आघाडीतर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करुन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, महिला आघाडीच्या सरिता माळी, मंगला बारी, शोभा चौधरी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
पाळणा गीत म्हणून केंद्र सरकारचा निषेध -
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फुलांनी सजविलेला पाळणा आणला होता. या पाळण्यात गॅस, पेट्रोल व डिझेल ठेवण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी झो बाळा झो रे झो… पाळणा गीत म्हणत त्यातून इंधनदरवाढीसह केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी केंद्र सरकारचे करायचे काय.. खाली डोके वरती पाय अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
महिलांच्याच नव्हे तर सर्वांच्या डोळ्यात धूर -
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या सरिता माळी यांनी आंदोलनाची भूमिका मांडताना सांगितले की, केंद्र सरकारने देशातील महिलांच्या डोळ्यात धूर जाऊन अश्रू येवू देणार नाही, असे अश्वासन दिले होते. मात्र, गॅस, पेट्रोल व डिझेलची दरवाढ करीत सर्वच देशवासीयांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. इंधनदरवाढ कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली. माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी देखील इंधन दरवाढीवरुन केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त केला.