जळगाव - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन तत्काळ हटवण्यात यावे, अशी मागणी जळगावातील एका शिवसैनिकाने पत्राद्वारे थेट राष्ट्रपतींकडे केली आहे. गजानन पुंडलिक मालपुरे असे राज्यपालांची तक्रार करणाऱ्या शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्याचे नाव आहे. ते शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख आहेत.
गजानन मालपुरे यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांत विविध घटना, घडामोडी घडल्या आहेत. काही घटनांवरून राज्याचे राजकारण तापले होते. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये परस्परांविरुद्ध आरोप-प्रत्यारोपही झाले. त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भूमिका घेतली.
राज्यपालांचे वर्तन निंदनीय-
कोरोना संक्रमण काळात राज्य शासनाने मंदिरे उघडण्यासंदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्या पत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना 'आपण हिंदुत्व विसरलात का?' असा सवाल केला होता. राज्यपालांचे असे वर्तन निंदनीय होते. महाराष्ट्र पोलिसांबाबत सिनेअभिनेत्री कंगना रणौतचे वक्तव्य, बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण याबाबतची त्यांची भूमिका, तसेच नुकतेच पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आल्यानंतर राज्यपालांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना संपर्क केला होता. गृहमंत्र्यांना संपर्क करुन त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली होती. गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना भेटू देण्याबाबतही राज्यपालांनी गृहमंत्र्यांशी चर्चा केली. हा प्रकार म्हणजे, अत्याचारीत अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांना न्यायापासून वंचित ठेवण्याइतपत गंभीर आहे, असे गजानन मालपुरे यांनी पत्रात म्हटले आहे.
राज्यपालांकडून पदाचा अवमान-
राज्यपालांसारख्या संवैधानिक पदावर असताना भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्र्यांना असा फोन करणे, अर्थातच संशयित आरेापीला कुठेतरी पाठबळ देणे व पोलीस तपासात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ढवळाढवळ करण्यासारखे आहे. अशा प्रकारच्या वर्तनामुळे राज्यपालपदाची प्रतिष्ठा ढासळून पदाचा अवमान होत आहे. अर्थातच, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांना तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तत्काळ पदमुक्त करावे, अशी मागणी गजानन मालपुरे यांनी केली आहे.
हेही वाचा- कुंभार व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतिक्षेत; मातीचे दिवे तसेच पडून