जळगाव - कोरोना विषाणूचा नवा 'डेल्टा प्लस' व्हेरियंट समोर आला असून, राज्यात त्याचे 21 रुग्ण आढळले आहेत. जळगाव जिल्ह्यातील 7 रुग्णांचा त्यात समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात आढळलेले 'डेल्टा प्लस' व्हेरियंटचे सातही रुग्ण एकाच क्षेत्रातील आहेत. त्यांना मे महिन्यात कोरोनाची लागण झालेली होती. परंतु, कोणत्याही स्वरुपाची लक्षणे नव्हती. ते रुग्ण गृहविलगीकरणातच बरे झाले. त्यामुळे कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट आला म्हणून घाबरून जाऊ नये. एकमेकांपासून सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि सॅनिटायझेशन ही त्रिसूत्री पाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्यानंतर नागरिकांनी घाबरून जाऊ नये, म्हणून या विषयाची पूरक माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राऊत पुढे म्हणाले, कोरोना विषाणूच्या जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यातून 100 अशा प्रकारे साडेसात हजार रुग्णांचे नमुने एनआयव्हीकडे पाठवले होते. त्यात 21 रुग्णांचे नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंट आढळला आहे. जळगाव जिल्ह्यातील 7 रुग्णांच्या नमुन्यांमध्येही हा व्हेरियंट सापडला. हे सर्व रुग्ण हे एकाच भौगोलिक क्षेत्रातील असून, हे क्षेत्र ग्रामीण भागात मोडते. नवा व्हेरियंट समोर आल्यानंतर संबंधित क्षेत्रात जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरोग्य यंत्रणेची मदत घेऊन तातडीने रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले. दिलासादायक बाब म्हणजे, नव्या व्हेरियंटमुळे त्या क्षेत्रात पॉझिटिव्हिटी वाढली नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. जिल्ह्याच्या एकूण पॉझिटिव्हिटी प्रमाणेच त्या क्षेत्राची पॉझिटिव्हिटी ही 1.21 टक्के इतकी आढळली. मृत्यूदरही वाढलेला नसल्याचे स्पष्ट झाले. कोरोना पॉझिटिव्हिटीचा जिल्ह्यातील ओव्हर ऑल ट्रेंड प्रमाणेच स्थिती त्याठिकाणी आहे, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.
'ते' रुग्ण गृहविलगीकरणात झाले बरे-
'डेल्टा प्लस' व्हेरियंटचे सातही रुग्णांना मे महिन्यात कोरोनाची लागण झालेली होती. परंतु, त्यांच्यात कोरोनाची कोणत्याही स्वरुपाची लक्षणे नव्हती. ते रुग्ण गृहविलगीकरणातच बरे झाले. असे असले तरी नवा व्हेरियंट किती धोकादायक आहे, त्यामुळे काही चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते का? यासाठी सखोल अभ्यासाची गरज आहे. त्यावर एनआयव्ही, आयसीएमआर तसेच एनसीडीसी स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
काय आहे डेल्टा प्लस व्हेरियंट?
भारतात सर्वप्रथम आढळून आलेल्या डेल्टा म्हणजेच बी. १.६१७.२ या कोरोना विषाणू उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन घडून विषाणूचा डेल्टा प्लस हा नवा व्हेरियंट तयार झाला आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेल उपचार पद्धती या विषाणूचा प्रतिकार करते की नाही, हे समजून घेण्यासाठी संशोधन सुरू आहे.
हेही वाचा -#मराठा आरक्षण : सरकार सकारात्मक; एक महिन्यासाठी मूक आंदोलन पुढे ढकलले - संभाजीराजे छत्रपती