जळगाव (मुक्ताईनगर) - कमला एकादशीला गुरुवारी संत मुक्ताबाईचे नवे व जुने मंदिर जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार बंदच राहणार आहे. त्यामुळे वारकरी, भाविकांनी दिंड्या घेवून अथवा वाहनाने दर्शनासाठी येथे येवू नये, असे आवाहन मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
दरवर्षी आषाढ कृष्ण अथवा कमला एकादशीला संत मुक्ताबाई समाधी स्थळ कोथळी व मुक्ताईनगर येथे महावारीला हजारो भाविक दिंड्यांसह परंपरेने दाखल होत असतात. वारकरी भाविकांत या वारीचे विशेष महत्त्व आहे. परंतु यावेळी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जनतेत संसर्ग पसरू नये, म्हणून सरकारने मंदिरे दर्शनासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. गुरुवारी एकादशी वारी रद्दच राहणार आहे.भाविकांनी मुक्ताबाई दर्शनासाठी येवू नये. घरीच राहून मानसिक वारी करावी. फेसबुकवरील लाइव्ह दर्शन प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, रवींद्र हरणे महाराज व उद्धव जुनारे महाराज यांनी केले आहे.
अन्यथा हाेईल कारवाई
मुक्ताईनगर शहरात रुग्ण संख्या वाढत असल्याने बाहेरच्यांना प्रवेश दिला जाणार नाही. शहरात व मुक्ताई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. भाविकांनी एकादशीला येथे येण्याचा प्रयत्न करु नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येेणार आहे. घरीच रहा व सुरक्षित रहा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढल्याने प्रत्येकालाच खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने यंदा आषाढी वारीचा सोहळाही रद्द केला आहे.