जळगाव : 'जे स्वतः स्टेबल नाहीत, त्यांनी शिवसेनेला हिंदुत्त्व शिकवू नये', अशा शब्दांत शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसेवर टीका केलीये. राजकारणात कुठेही थारा नसल्यानेच आता त्यांनी हिंदुत्त्वाचा नवा नारा दिला आहे, असेही ते म्हणाले. जळगावात जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या 12 रुग्णवाहिकांच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
मुंबईत मनसेची बॅनरबाजी इकडे गुलाबरावांची फटकेबाजी-
दसऱ्यानिमित्ताने आज मुंबईत शिवसेना भवनासमोर मनसेने बॅनरबाजी केली आहे. मनसेकडून दसऱ्याच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सवर 'गर्व से कहो, हम हिंदू है' असा आशय लिहिला आहे. यावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही फोटोही छापण्यात आला आहे. शिवसेनेला लक्ष्य करणारे हे पोस्टर्स चर्चेचा विषय ठरले आहे. याच मुद्द्यावर जळगावात पत्रकारांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना छेडले असता त्यांनी मनसेवर टीकेचे बाण सोडले.
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, मनसेने स्थापनेवेळी सर्वधर्म समभावचा नारा दिला होता. पण नंतर त्यांनी परप्रांतीयांच्या कानात मारली. पक्षाचा झेंडा बदलला. मला तर त्यांचा झेंडा अजूनही दिसला नाही. त्यानंतर मनसेने पुन्हा मराठीपणा आणला. आज ते म्हणताय की गर्व से कहो हम हिंदू है. जे स्वतः स्टेबल नाहीत त्यांनी शिवसेनेला गर्वसे कहो हम हिंदू है, शिकवू नये. आमचे बापजादे फार पूर्वी ते म्हणत होते. आता हिंदुत्त्वाची भाषा करणारे हे शिवसेनेचीच पिलावळ आहे. शिवसेना ही आधीपासूनच हिंदुत्त्वाबरोबर आहे, होती आणि राहणार. बाळासाहेबांचे हिंदुत्त्व हिसकावण्याचा प्रयत्न काही जण करताय, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
35 वर्षांत पहिल्यांदा गावात दसरा साजरा करणार-
शिवसेनेचा आज दसरा मेळावा होत आहे, ही शिवसेनेची परंपरा आहे. पण आज कोरोनाचे निर्बंध असल्याने आम्हाला दसरा मेळाव्याला उपस्थितीची अडचण आहे. त्यामुळे 35 वर्षांनी मी दसरा गावाकडे साजरा करणार आहे, असेही ते म्हणाले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे विरोधकच नाहीत तर संपूर्ण देशाचे लक्ष असते, असेही त्यांनी सांगितले.
...तर शिवसेनाही जिल्हा बँक निवडणूक स्वबळावर लढणार-
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनलबाबत प्रयत्न सुरू आहेत. पण जर एकमत होत नसेल तर शिवसेनाच काय तर प्रत्येक पक्ष वेगळा लढेल. शिवसेनेचीही स्वबळाची तयारी आहे. बँक 'अ' वर्गात ठेवायची असेल तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी मांडले.
भाजपत हिंमत असेल तर त्यांनी महापौर बदलून दाखवावा-
जळगाव महापालिकेत भाजप पुन्हा बहुमतात आला आहे, तर त्यांनी महापौर बदलून दाखवावा, असे थेट आव्हानही गुलाबराव पाटील यांनी दिलंय. भाजपच्या नगरसेवकांनी गटनेतेपदाच्या नोंदणीसाठी दोन्ही पक्षांकडे नोंदणी केली आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - नारायण राणे यांचे मानसिक संतुलन बिघडले, बोलताना तारतम्य बाळगायला हवे- गुलाबराव पाटील