जळगाव - जो विषय विरोधकांनी लावून धरायला हवा होता, त्या विषयासाठी सत्तेत असलेल्या शिवसेनेला रस्त्यावर उतरावे लागत आहे. यावरून विरोधक महाराष्ट्रात कुचकामी ठरले आहेत, हे सिद्ध होते. विरोधकांना लाज वाटली पाहिजे. ते बेशरम आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी जाण नाही, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी आज जळगावात केले. दरम्यान, शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आमचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचे राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.
युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे गुरुवारी जनआशीर्वाद यात्रेसाठी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.
राऊत पुढे म्हणाले, पीक विमा कंपनी विरोधात रस्त्यावर उतरल्यानंतर विरोधक आमच्यावर टीका करत आहेत की सत्तेत असून आम्ही मोर्चे काढत आहोत. पण पीक विमा कंपनी काय आमच्यासोबत सत्तेत सहभागी नाही. असे कोणत्या घटनेत लिहलंय की सत्तेत असताना लोकांच्या प्रश्नांवर बोलायचे नाही. आम्ही सत्तेत असतानाही आणि विरोधात असतानाही लोकांच्या प्रश्नांवर बोलतच होतो. जो विषय विरोधकांनी लावून धरायला हवा होता, त्या विषयासाठी आम्ही पुढे सरसावलो. यावरून विरोधक कुचकामी असल्याचे स्पष्ट होते. आज राज्यात किंवा देशात विरोधकांची जी वाताहत झाली आहे, ती केवळ त्यांच्यातील नैराश्य तसेच वैफल्यामुळेच झाली आहे, असे टीकास्त्र राऊत यांनी सोडले.
- राममंदिर प्रश्नी आमचा सरकारवर दबाव-
राममंदिराच्या विषयावर बोलताना राऊत म्हणाले, तुम्ही लखनऊला जा किंवा अयोध्येत जा. तुम्हाला एकच उत्तर मिळेल की राममंदिराचा प्रश्न केवळ शिवसेनाच सोडवू शकते. या प्रश्नाला परत जाग आणण्याचे काम आम्ही केले आहे. वर्षभरात आम्ही 2 वेळा उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला जाऊन आलो. राममंदिर प्रश्नी आमचा सरकारवर दबाव आहे. हे प्रकरण आता न्यायालयात नेटाने सुरू आहे. येत्या 2 वर्षात राममंदिराचा प्रश्न निकाली निघेल, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
- हाफिज सईदला अटक म्हणजे पाकिस्तानचे नाटक-
आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तानने अटक केली आहे, याविषयी शिवसेनेला काय वाटते? अशी विचारणा पत्रकारांनी केली असता संजय राऊत म्हणाले, हाफिज सईद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. भारताने वेळोवेळी तसे पुरावे पाकिस्तानसह 'युनो'च्या सुरक्षा परिषदेकडे सादर केले आहेत. दहशतवादाविषयी जगभरातून पाकिस्तानवर दबाव वाढत आहे. दहशतवाद्यांवर कारवाई केली नाही तर भारतासह जगातील इतर देश आपल्या आर्थिक नाड्या आवळतील, अशी भीती पाकिस्तानला आहे.
या भीतीतून त्यांनी हाफिज सईदच्या अटकेचे नाटक केले आहे. मुंबई, उरी, पठाणकोटसह पुलवामासारख्या हल्ल्यांचा तो मास्टरमाइंड असल्याचे पुरावे भारताने दिल्याने चीनने त्याच्या पाठीमागचा हात काढून घेतला आहे. आता खरच पाकिस्तानला त्याच्यावर कारवाई करायची असेल तर त्याला भारताच्या स्वाधीन करावे. यापूर्वीही पाकिस्तानने सईदला 28 वेळा अटक केली आहे. पण ती केवळ थोतांड होते, असेही राऊत म्हणाले.
- मुख्यमंत्री पद सेनेच्या वाट्याला आले तर आदित्य ठाकरे आमचे उमेदवार-
भाजप आणि शिवसेनेत युती आहे. मुख्यमंत्री पदाबाबत युतीची भूमिका मांडताना संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री पद शिवसेनेच्या वाट्याला आले तर आदित्य ठाकरे आमचे उमेदवार असतील. कारण मुख्यमंत्री पदासाठी आवश्यक असलेले सगळे गुण आदित्य ठाकरे यांच्यात नेतृत्वात आहेत. महाराष्ट्राला हवं असलेलं सक्षम, तरुणांमध्ये आशा व अपेक्षा निर्माण करणारं नेतृत्व मला आदित्य ठाकरेंमध्ये दिसते. गेल्या काही वर्षांपासून ते संपूर्ण महाराष्ट्रात बेरोजगार युवक तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेतृत्व करत आहेत. ते नुसते प्रश्न मांडत नाही तर सोडवताय देखील. राजकारणात यापेक्षा चांगले काय असू शकते, अशी स्तुतिसुमने राऊत यांनी आदित्य ठाकरेंवर उधळली.
या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, गुलाबराव वाघ आदी उपस्थित होते.