जळगाव - जिल्ह्यात यावेळची विधानसभा निवडणूक बंडखोरीच्या मुद्यावरून चांगलीच गाजली. युतीच्या फॉर्म्युल्यात जिल्ह्यातील ११ मतदारसंघांपैकी ४ मतदारसंघ हे सेनेच्या तर उर्वरित ७ मतदारसंघ भाजपच्या वाट्याला होते. असा फॉर्म्युला ठरलेला असताना भाजपने सेनेच्या वाट्याला असलेल्या चारही मतदारसंघात बंडखोर पेरलेले होते. मात्र, बंडखोरांचे आव्हान मोडून काढत सेनेच्या उमेदवारांनी बाजी मारल्याने भाजप बंडखोरांच्या हाती भोपळा लागला आहे
जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण, पाचोरा, एरंडोल आणि चोपडा हे ४ मतदारसंघ सेनेच्या वाट्याला होते. या चारही मतदारसंघात भाजपने बंडखोर रिंगणात उतरवून सेनेच्या उमेदवारांच्या वाटेत काटे पेरले होते. जळगाव ग्रामीण मतदारसंघात सेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात चंद्रशेखर अत्तरदे यांनी बंडखोरी केली होती. अत्तरदे यांच्या बंडखोरीमुळे प्रथमदर्शनी एकतर्फी वाटणारी लढत चुरशीची झाली होती. गुलाबराव पाटलांसमोर राष्ट्रवादीच्या उमेदवार पुष्पा महाजन यांच्याऐवजी चंद्रशेखर अत्तरदे यांचेच मोठे आव्हान होते. कारण भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. पाटील, सेनेचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील यांनी अत्तरदे यांना पाठबळ देत गुलाबराव पाटलांच्या अडचणी वाढवल्या होत्या. परंतु, कार्यकर्त्यांची मजबूत फळी, ५ वर्षांच्या कार्यकाळात केलेली विकासकामे आणि मतदारसंघाशी जुळलेली नाळ या त्रिसूत्रीच्या बळावर त्यांनी अत्तरदे यांची बंडखोरी मोडून काढली. दुसरीकडे, पाचोऱ्यात विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्याविरोधात भाजपचे नगरसेवक अमोल शिंदे यांनी बंडखोरी केली होती. ही लढत शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीची ठरली. मात्र, अखेर किशोर पाटलांनी २ हजार ८४ मतांनी निसटता का होईना विजय मिळवला. एरंडोल आणि चोपड्यातही भाजपचे बंडखोर करिष्मा दाखवू शकले नाहीत. एरंडोलमध्ये चिमणराव पाटलांनी भाजपचे बंडखोर गोविंद शिरोळे यांना तर चोपड्यात लता सोनवणे यांनी भाजपचे जिल्हा परिषद सभापती प्रभाकर सोनवणे यांना अस्मान दाखवले.
तिकडे मुक्ताईनगरातही सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटलांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेंविरोधात केलेल्या बंडखोरीचा मुद्दा चर्चेत राहिला. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी केल्याचा दावा केला खरा; पण पक्षाने त्यांचा राजीनामा स्वीकारला नसल्याचे बोलले जात आहे. एकनाथ खडसेंनी अनेकदा ही खदखद जाहीरपणे बोलूनही दाखवली. पण खडसेंच्या बोलण्याकडे सेनेने दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळाले. चंद्रकांत पाटलांच्या अपक्ष उमेदवारीला ढाल करत राष्ट्रवादीने देखील खडसेंना खिंडीत गाठण्याची संधी सोडली नाही. आपला उमेदवार मागे करत राष्ट्रवादीने चंद्रकांत पाटलांना पुरस्कृत केले. या माध्यमातून खडसेंच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचे काम राष्ट्रवादीने केले. शेवटी व्हायचे तेच झाले, खडसेंच्या कन्येला पराभवाला सामोरे जावे लागले. या अनपेक्षित निकालामुळे एकनाथ खडसेंच्या ४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीला जबर धक्का बसला आहे.
हेही वाचा - कुस्तीतले खरे वस्ताद पवारच, उतू नका मातू नका नाहीतर माती होईल, सेनेचा भाजपला टोला
बंडखोरीच्या मुद्यावर बोलताना उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील बंडखोरी शमलेली असेल, असे खुद्द जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले होते. मात्र, बंडखोरांनी आपला आक्रमक पवित्रा मागे घेतलाच नाही. त्यानंतर भाजपने आपल्या बंडखोरांवर तातडीने कारवाई देखील केली नाही. यामुळे भाजपनेच बंडखोरांना छुपे पाठबळ दिले होते की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता समोर आलेल्या निकालात सेनेच्या उमेदवारांनी भाजपच्या बंडखोरीला झुगारून लावल्याचे पाहायला मिळाल्याने नैतिकदृष्टया सेनेचा विजय झाला आहे, असेच म्हणावे लागेल.