जळगाव - जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हाकाकोडा येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी एका किराणा दुकानाचे शटर वाकवून दुकानातून हजारो रुपयांची रोकड आणि काही किराणा माल चोरून नेला. येथे चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गावातील भरचौकात असलेल्या दुकानांमध्ये सातत्याने चोऱ्या होत आहेत. दरम्यान, चोरी करणारे तिघे चोरटे दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
कुऱ्हाकाकोडा येथे असलेल्या वडोदा वनक्षेत्र कार्यालयासमोर गजानन ढोले यांच्या मालकीचे गजानन प्रोव्हिजन नावाने किराणा दुकान आहे. या दुकानात ही चोरी झाली आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करत रोकड लांबवली. सकाळी दुकान मालक गजानन ढोले हे नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाच्या शटरचे लॉक तोडलेले दिसले. त्यांनी लागलीच पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
चोरट्यांचे पोलिसांना खुले आव्हान-
ज्या ठिकाणी चोरी झाली तेथून कुऱ्हा पोलीस दूरक्षेत्र हाकेच्या अंतरावर आहे. असे असताना, गेल्या महिनाभरात चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यापूर्वी झालेल्या चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे. गजानन ढोले यांच्या दुकानातील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत. त्याचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.