जळगाव - जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पाणीटंचाई, दुष्काळी अनुदान, पीकविमा, रखडलेले सिंचन प्रकल्प यासारख्या विषयांवर प्रश्नांची सरबत्ती करत शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना 'गोलमाल' उत्तरे देऊन चंद्रकांत पाटील यांनी वेळ मारून नेली.
जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यावर असताना त्यांनी चाळीसगाव, पारोळा तसेच अमळनेर या 3 तालुक्यातील 10 ते 12 गावांना भेटी देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. मात्र, हा दौरा अत्यंत घाईघाईत आटोपल्याने शेतकऱ्यांना आपल्या अडचणी मांडता आल्या नाहीत. त्यामुळे 'शितावरून भाताची परीक्षा करण्यात काय अर्थ' अशा शब्दांत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
सकाळी 8 वाजेपासून पाटील यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. चाळीसगाव तालुक्यातील वाघळी, हिरापूर या गावात पाहणी केल्यानंतर त्यांनी पारोळा तालुक्यातील 3 ते 4 गावांमध्ये पाहणी करत शेतकऱ्यांशी धावता संवाद साधला. त्यानंतर अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावाला त्यांनी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास भेट दिली. या ठिकाणी शेतकऱ्यांनी चंद्रकांत पाटील यांना भाषण करत असताना मध्येच थांबवत पाणीटंचाई, दुष्काळी अनुदान, पीकविमा, रखडलेले सिंचन प्रकल्प यासारख्या विषयांवर प्रश्नांची सरबत्ती केली.
अमळनेर तालुक्यासाठी वरदान ठरणारा पाडळसे येथील तापी नदीवरील निम्न तापी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भाजप सरकारने का निधी दिला नाही, अमळनेर तालुक्यातील एकूण 8 मंडळांपैकी 7 मंडळांना पीक विम्याच्या लाभापासून का वंचित ठेवले, पिण्यासाठी पाणी मिळत नसताना टँकरची संख्या का वाढत नाही, असे प्रश्न विचारत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी 'मी दुष्काळी परिस्थितीसह शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी आलो आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि सरकार दरबारी तुमच्या समस्या मांडणार आहे', असे सांगत शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांना उत्तरे देणे टाळून काढता पाय घेतला.
जलपुनर्भरणासाठी निधीची घोषणा -
आनोरे गावात दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवल्यानंतर आनोरे ग्रामस्थांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी आनोरे गावासाठी जलपुनर्भरणाच्या कामांसाठी 15 लाख रुपये निधीची घोषणा केली. ग्रामस्थांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी करून पाटील यांनी कौतुक केले.
पीक विम्यासाठी दिले निवेदन -
मंगरूळ गावात काही शेतकऱ्यांनी चंद्रकांत पाटील यांना पीक विम्याच्या लाभ मिळावा म्हणून निवेदन दिले. अमळनेर तालुक्यातील एकूण 8 मंडळांपैकी 7 मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. या प्रकरणी संबंधित विमा कंपनीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना बागायती शेती असताना तसेच बागायती शेतीचे सातबारा उतारा घेतलेला असताना जिरायती शेतीचे दुष्काळी अनुदान दिले जाते. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. बागायती शेती असलेल्या शेतकऱ्यांना बागायती शेतीचेच अनुदान दिले जावे, अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी यावेळी केली.