जळगाव - कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे पुन्हा संकट उभे राहिले आहे. त्यामुळे, खबरदारी म्हणून जिल्ह्यात नव्याने निर्बंध घालण्यात आले आहेत. आता यापुढे 'नॉन इसेन्सियल' सेवांसाठी सोमवार ते शुक्रवार दरम्यान दुपारी 4 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी म्हणजेच, शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन असणार आहे. या काळात नॉन इसेन्सियल सेवा पूर्णपणे बंद असतील. अत्यावश्यक सेवांमध्ये मेडिकल दुकाने व वैद्यकीय सेवा वगळता इतर दुकाने देखील 4 वाजेपर्यंत सुरू असतील. दरम्यान, नियम मोडणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी महापालिकेची 6 पथके तैनात असणार आहेत. या शिवाय पोलीस प्रशासन देखील दंडात्मक कारवाई करणार आहे.
हेही वाचा - 'देवेंद्र फडणवीस यांनी भीष्मप्रतिज्ञा मोडून लग्न केले'
सायंकाळी 5 नंतर संचारबंदी -
नव्या आदेशानुसार जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेनंतर सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी असेल. कोणत्याही व्यक्तीस वैद्यकीय गरज वगळता मुक्तपणे फिरण्यास मनाई घालण्यात आली आहे. दररोज सायंकाळी 5 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी एका वेळेस 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे.
सुपरस्प्रेडरची होणार कोरोना चाचणी -
डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका पाहता खबरदारी म्हणून, ज्या व्यावसायिकांचा लोकांशी थेट संपर्क येतो, अशा व्यावसायिकांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. जळगाव जिल्ह्यासाठी 1 लाख आरटीपीसीआर किट उपलब्ध आहेत. दिवसाला 5 हजारांपेक्षा अधिक चाचणी करण्याचे लक्ष्य आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेच्या समन्वयातून ही उपाययोजना केली जाणार आहे. जळगाव जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. जिल्हा पहिल्या स्तरात आहे. परंतु, डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका संभवतो म्हणून जिल्ह्यात तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू केले आहेत.
अशा प्रकारे आहेत नवे निर्बंध -
- अत्यावश्यक सेवा (दररोज दुपारी 4 वाजेपर्यंत, मेडिकल दुकाने व वैद्यकीय सेवा वगळून, सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानात 5 पेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये, दुकानाच्या दर्शनी भागात काच किंवा पारदर्शक शीट लावावी, सॅनिटायझेशनची व्यवस्था करावी)
- अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने व आस्थापना (सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत, शनिवारी व रविवारी पूर्णपणे बंद)
- शॉपिंग मॉल, थिएटर्स, नाट्यगृह, सिंगल स्क्रिन मल्टिप्लेक्स (पूर्णपणे बंद)
- हॉटेल, रेस्टॉरंट व बार (50 टक्के ग्राहक क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत डायनिंग सुरू, दुपारी 4 ते रात्री 9 पर्यंत केवळ पार्सल सेवा, शनिवारी व रविवारी डायनिंग पूर्णपणे बंद व केवळ पार्सल सेवा)
- सार्वजनिक ठिकाणे, मॉर्निंग वॉक, सायकलिंग (दररोज सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सुरू)
- खासगी कार्यालये (सुरू, 50 टक्के क्षमतेसह दुपारी 4 वाजेपर्यंत, फक्त वर्किंग डेसाठी)
- शासकीय कार्यालये (नियमित वेळ, कर्मचारी उपस्थिती 50 टक्के)
- आंतरजिल्हा प्रवास (सुरू, लेव्हल 5 मध्ये समावेश असणाऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी पोलिसांकडून ई-पास आवश्यक)
- क्रीडा प्रकार, तत्सम स्पर्धा (दररोज सकाळी 5 ते 9 दरम्यान सुरू, आऊटडोअर स्पोर्ट्स ओन्ली)
- जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा तसेच वेलनेस सेंटर्स (50 टक्के ग्राहक क्षमतेसह, दुपारी 4 वाजेपर्यंत, एसी वापरण्यास मनाई)
- सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम (50 टक्के क्षमतेसह 2 तासांच्या आत, सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत)
- लग्न समारंभ (सुरू, एकाचवेळी 50 लोकांच्या उपस्थितीत, दुपारी 4 वाजेपर्यंत)
- अंत्यविधी (केवळ 20 लोकांच्या उपस्थितीत)
- सर्व बैठका, ग्रामपंचायत व को-ऑपरेटिव्ह निवडणुका (50 टक्के क्षमतेसह)
- सर्व बांधकामे (दुपारी 4 वाजेपर्यंत)
- कृषी संबंधित कामे (दुपारी 4 वाजेपर्यंत)
- ई कॉमर्स सेवा (दररोज सुरू)
- सार्वजनिक वाहतूक (100 टक्के क्षमतेसह सुरू)
- मालवाहतूक (सुरू, केवळ 3 व्यक्तींकरिता)
- शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, तसेच शैक्षणिक प्रशिक्षण संस्था (बंद, ऑनलाईन व दूरस्थ प्रणालीने सुरू)
हेही वाचा - धामण सापाला रस्त्यावर आपटून केले ठार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल