जळगाव - जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. भाजपकडून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे व काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यात चुरशीची लढत होती. आजपर्यंत या मतदारसंघातून लेवा समाजाचा उमेदवार संसदेत प्रतिनिधित्व करत आला आहे. या वेळच्या निवडणुकीत लेवा समाजाचेच दोन्ही तुल्यबळ उमेदवार रिंगणात असल्याने नेमकी कोणाला संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारी
- चोपडा - 57.14%
- रावेर-यावल - 62.01%
- भुसावळ - 48.87%
- जामनेर - 55.07%
- मुक्ताईनगर - 57.56 %
- मलकापूर - 60.99 %
- 5 pm - 56.83 टक्के मतदान
- 3 pm - 46.04 टक्के मतदान
- 1.50 pm - 35.15 टक्के मतदान पूर्ण
- 11 am - 21.24 टक्के मतदान पूर्ण
- 10.16 am - पहिल्या दोन तासात 8.48 टक्के मतदान
- 8.33 am जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मुलांच्या शाळेत मतदारांची गर्दी
- 8.29 am - मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह
- 8.11 - भाजपचे हेविवेट नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी या गावी मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र.
- 7 am - मतदानाला सुरुवात
भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांना सासरे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नावाचे वलय आहे. मात्र, महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे याठिकाणी अद्यापही मनोमिलन झालेले नाही. त्यामुळे रक्षा खडसेंना मैदान मारणे सोपे नसल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
रावेरमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रमुख लढत असली तरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नितीन कांडेलकर यांच्याकडेही लक्ष असेल. या मतदारसंघात आदिवासी मुस्लीम तसेच दलित समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत. कारण रक्षा खडसे आणि उल्हास पाटील हे दोन्ही लेवा समाजाचे उमेदवार असल्याने लेवा समाजातील मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या ताकदीमुळे प्रथमदर्शनी रावेरात भाजपचे पारडे जड आहे. त्यामुळे डॉ. पाटलांना चांगला जोर लावावा लागेल, हे निश्चित.