जळगाव - भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे दिल्लीत महाराष्ट्राच्या दृष्टीने राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. हिच पोकळी भरून काढण्यासाठी भाजपने आता ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भविष्यात केंद्रीय मंत्रिपद देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रावेर लोकसभा मतदारसंघात खडसेंचे नाव अग्रस्थानी आहे.
लोकसभा निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपने केलेल्या सर्वेक्षणासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, भाजप प्रदेश कार्यालयाने संभाव्य उमेदवार म्हणून काही नावे पुढे केली आहेत. यात विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी खासदार तथा विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे, ओेबीसी मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी अजय भोळे यांची नावे चर्चेत आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी २ दिवसांपूर्वी दिल्लीत सादर केलेल्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत रावेर लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री खडसेंचे नाव आघाडीवर आहे. सलग दोन वेळा खासदार राहिलेले विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे यांची २०१४ च्या निवडणुकीत पक्षाने पहिल्या यादीत जाहीर केलेली उमेदवारी ऐनवेळी कापली होती. आता २०१९ च्या पक्षाच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत आमदार जावळे यांचेदेखील नाव समाविष्ट करण्यात आले आहे. परंतु, माजी मंत्री खडसेंची नाराजी दूर करण्यासह दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खडसेंना रावेरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते. सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्यासोबत खडसेंना पाठवण्याचा पक्षश्रेष्ठींचा विचार आहे.
जोरदार राजकीय घडामोडी -
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा अपवाद वगळता दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व ताकदीने करू शकेल, असा एकही भाजप नेता सध्या लोकसभेच्या सभागृहात नाही. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर दिल्लीत महाराष्ट्राचे मातब्बर नेते म्हणून रिक्त झालेली पोकळी भरून निघू शकलेली नाही. त्या दृष्टीने ही पोकळी भरून काढण्यासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव लोकसभेसाठी चर्चेत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून पक्षात एकाकी असलेल्या खडसेंना केंद्रात घेऊन मंत्रीपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्या दृष्टीने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जावू शकते. लोकसभेसाठी खडसे राजी झाल्यास त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील जागा पक्षाकडून कोणाला दिली जाईल, याबाबत अद्याप काही सांगता येणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.