जळगाव - भुसावळातील भाजपचे नगरसेवक रवींद्र बाबुराव खरात उर्फ हंप्या यांच्यासह 5 जणांच्या सामूहिक हत्याकांडाची सीआयडीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे. सीआयडी चौकशीतून या प्रकरणातील खरे सूत्रधार समोर येतील. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या हत्याकांडाचा लवकर छडा लावून खरात परिवाराला न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
भुसावळातील सामूहिक हत्याकांडाच्या घटनेनंतर खरात कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आठवले सोमवारी सायंकाळी भुसावळात आले होते. यावेळी ते बोलत होते. या हत्याकांडात मृत झालेल्या पाचही जणांवर सोमवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आठवले यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते. सूडाच्या भावनेतून ही घटना घडली असून त्यामागे बड्या राजकीय लोकांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी झाली पाहिजे, असे मत यावेळी आठवले यांनी व्यक्त केले.
तीन संशयित अटकेत -
या हत्याकांडानंतर पोलिसांनी लागलीच ३ संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यात शेखर उर्फ राजा हिरालाल मोघे, राज बॉक्सर उर्फ मोहसीन अजगर खान आणि मयूर सुरवाडे यांचा समावेश आहे. या तिघांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. या हत्याकांडामागे काही राजकीय कंगोरे आहेत का, हल्लेखोरांना कोणी सुपारी देऊन हे हत्याकांड घडवले आहे का, या दृष्टीने पोलीस तपास सुरू आहे.
हेही वाचा - भुसावळ्यात सामूहिक हत्याकांडानंतर तणावपूर्ण शांतता; घटनास्थळी जमावबंदी लागू
या हत्याकांडाच्या घटनेनंतर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी सोमवारी दुपारी भुसावळात येऊन घटनेची माहिती जाणून घेतली. घटनास्थळी पाहणी करून त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा सखोल तपास करण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड घडल्याचा अंदाज असला तरी या प्रकरणाचे ठोस कारण अद्यापही समोर आलेले नाही. त्यामुळे, हे कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
हेही वाचा - भुसावळमधील सामूहिक हत्याकांडाला राजकीय पूर्ववैमनस्याची किनार