जळगाव - जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या सन्मानार्थ जळगावात शुक्रवारी दुपारी रॅली काढण्यात आली. पाकिस्तानच्या झेंड्यावर चालत जाऊन नागरिकांनी ही रॅली काढली. श्री स्वामी विवेकानंद बहुद्देशीय मंडळ आणि राष्ट्रीय सुरक्षा मंचातर्फे या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या रॅलीत सहभाग नोंदवला. रॅलीदरम्यान पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्या.
पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यात ४५ भारतीय जवानांना वीरमरण आले होते. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी ही भव्य रॅली काढण्यात आली. नागरिकांनी या रॅलीत सहभाग नोंदवत पाकिस्तानच्या या अमानवीय कृत्याचा निषेध नोंदवला.
कैलास सोनवणे, अनिल सोनवणे यांनी या रॅलीचे नेतृत्व केले. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर तेथे जाहीर सभा झाली. या सभेला प्रमुख वक्ते डॉ. संदीपराज महिंद यांनी मार्गदर्शन केले. रॅली संपल्यानंतर रॅलीत सहभागी झालेल्या सर्व नागरिकांनी वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप झाला. भारतीय लष्कराने पाकिस्तानचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.