जळगाव - जिल्ह्यातील चाळीसगाव, अमळनेर, एरंडोल, धरणगाव तालुक्यात ठिकठिकाणी आज (गुरुवारी) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. एरंडोल तालुक्यातील तळई, उत्राण परिसरात अर्धा ते पाऊण तास गारपीट झाल्याने फळबागांसह गहू आणि हरभरा या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच अतिवृष्टीमुळे हतबल झालेल्या बळीराजाला पुन्हा एकदा बेमोसमी पावसाने हादरा बसला आहे.
चालू हंगामात थंडीचे प्रमाण वाढत असताना गुरुवारी अचानक वातावरण बदलाचा अनुभव आला. जळगाव जिल्ह्यातील ४ ते ५ तालुक्यांना बेमोसमी पावसाने दणका दिला. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांसह लिंबू, पेरू तसेच मोसंबी बागांना मोठा फटका बसला आहे. वादळामुळे बागायती कापसाची झाडेही जमीनदोस्त झाली. सध्या कापूस वेचणी सुरु आहे. मात्र, या बेमोसमी पावसामुळे कापूस भिजून मोठे नुकसान झाले आहे. सर्वच ठिकाणी अर्धा ते पाऊण तास मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे शेतपीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.
हेही वाचा - ऐन हिवाळ्यात मुंबईत पाऊस; अरबी समुद्रात घोंगावणार पवन आणि अम्फन चक्रीवादळे
उरल्या-सुरल्या आशाही मावळल्या
अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांची मदार आता रब्बी हंगामावर होती. परंतु, बेमोसमी पावसामुळे रब्बीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत.