जळगाव - रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याच्या संशयावरून रेल्वे सुरक्षा बलच्या पथकाने एका एजंटला ताब्यात घेतले आहे. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील तेली गल्ली परिसरात ही कारवाई करण्यात आली. पंकज आनंदा बारी असे ताब्यात घेतलेल्या एजंटचे नाव आहे. तो जळगावातील तेली गल्लीत किराणा दुकान चालवतो. याच ठिकाणी तो एजंट म्हणून रेल्वेची तिकिटे विकत होता.
याप्रकरणी जळगाव रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक सी. एस. पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावातील तेली गल्लीत संशयित आरोपी पंकज बारी हा किराणा दुकान चालवतो. त्याने सुमारे दोन वर्षांपूर्वी रेल्वेच्या तिकिटांच्या विक्रीसाठी 'आयआरसीटीसी' पोर्टलचे एजंट म्हणून रजिस्ट्रेशन मिळवले होते. आपल्या किराणा दुकानातून तो रेल्वेचे तिकीट विक्री सेंटरचे काम चालवत होता. दुसऱ्याचा आयडी वापरून तो रेल्वेची तिकिटे काढून विकत होता. यासाठी तिकिटांच्या मूळ किमतीपेक्षा जास्तीचे पैसे घेत होता. ही बाब रेल्वेच्या सायबर सेल विभागाच्या लक्षात आली होती. त्यानुसार जळगाव येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाला कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या. गुरुवारी दुपारी रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने पंकजच्या किराणा दुकानावर छापा टाकला. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे असलेले काही इलेक्ट्रॉनिक साहित्यही ताब्यात घेण्यात आले आहे, असेही पोलीस निरीक्षक सी. एस. पटेल यांनी सांगितले.
संपूर्ण रेकॉर्ड तपासला जाणार-
दरम्यान, प्राथमिक चौकशीत पंकज बारी याने गेल्या आठवडाभरात दोन ते तीन वेळा दुसऱ्या व्यक्तीचा आयडी वापरून तिकीट काढल्याचे समोर आले आहे. अशाच पद्धतीने त्याने मागील काळातही तिकिटांचा काळाबाजार केल्याचा संशय आहे. त्यामुळे त्याच्या एजंट रजिस्ट्रेशनचा संपूर्ण रेकॉर्ड तपासला जाणार आहे. जळगाव रेल्वे सुरक्षा दलाने त्याच्या रजिस्ट्रेशनची माहिती मुख्यालयातील सायबर सेलला दिली असून, त्यांच्या तपासणीत सारा गैरप्रकार समोर येईल. किती रुपयांची तिकिटे काढण्यात आली आहे, किती रुपयांचा काळाबाजार आहे, हे समोर येईल. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक सी. एस. पटेल यांनी सांगितले.
हेही वाचा - भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला एकनाथ खडसेंची ऑनलाइन उपस्थिती