जळगाव - कॉलेजच्या पहिल्याच दिवशी मध्यरात्री वसतिगृहात 28 विद्यार्थ्यांना डांबून, विवस्त्र करून त्यांचे रॅगिंग केल्याचा खळबळजनक प्रकार इकरा युनानी महाविद्यालयात घडला. या घटनेतील पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी सोमवारी त्याचा प्रवेश रद्द करुन घेतला. या प्रकारामुळे आपल्या मुलाच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, त्याला यापुढे चांगली वागणूक मिळणार नसल्याने प्रवेश रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी सांगितले. या प्रकारामुळे त्या विद्यार्थ्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले आहे.
11 ऑक्टोबरला संबंधित विद्यार्थ्याला पालकांनी महाविद्यालयात सोडले होते. पहिल्याच दिवशी त्याच्यासोबत हा प्रकार घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. महाविद्यालय प्रशासनाने या घटनेची गांभिर्याने दखल घेत तीन विद्यार्थ्यांचे निलंबन केले आहे.पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी केंद्र शासनाच्या दिल्ली येथील अॅन्टी रॅगिंग सेलकडे मेलद्वारे तक्रार केली असून, त्यानुसार प्राथमिक चौकशी सुरू झाली आहे. तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांकडून सहकार्यास टाळाटाळ
या प्रकरणात सुरुवातीला गुन्हा दाखल करून घेणे अपेक्षित असताना देखील पोलिसांनी पीडित विद्यार्थ्याला सहकार्य करण्याचे नाकारल्याचे समोर आले आहे. रॅगिंग सेलचा अहवाल आल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांनी प्रवेशासाठी महाविद्यालयात 94 हजार रुपये फी भरली आहे. तसेच प्रवेशासाठी जमा केलेले कागदपत्र परत मिळावे, अशी मागणी पालकांनी महाविद्यालय प्रशासनाकडे केली आहे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी महाविद्यालयाने चौकशी समिती नेमली असून, या समितीच्या अहवालानंतर पोलीस प्रशासन दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई करणार आहेत.