जळगाव - कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी जळगाव महापालिकेच्या पथकातर्फे विना मास्क फिरणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पथकातर्फे आज सुभाष चौकात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. यावेळी काही नागरिकांनी दंड भरण्यावरून पथकाशी हुज्जत घातल्याचे पाहावयास मिळाले.
कारवाईदरम्यान एका तरुणाची दुचाकी महापालिकेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी उचलून घेतली होती. दंड भरण्यास तयार असताना देखील कर्मचाऱ्यांनी दुचाकी जप्त केल्याची तक्रार तरुणाने केली आहे. तर, पालिका कर्मचाऱ्यांनी, तरुणाने दंड न भरल्याने कारवाई केल्याचे सांगितले.
नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क वापरावा - उपायुक्त
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना खबरदारीचा उपाय म्हणून विना मास्क फिरणारे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर प्रत्येकी २०० रुपयांचा दंड करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपायुक्त वाहुळे यांनी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क वापरावा व सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, असे आवाहन केले.
हेही वाचा - रेल्वेची संख्या वाढवा..! जळगाव जिल्ह्यातील ८९६ रेल्वे तिकीटे रद्द, २ लाख ७५ हजारांचा दिला परतावा