जळगाव - हैदराबाद येथे पशुवैद्यकीय डॉक्टर युवतीवर घडलेल्या बलात्काराच्या घटनेचा जळगावात अखिल भारतीय युवक महासंघाच्या वतीने निदर्शने करत तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी युवक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी या प्रकरणातील चारही आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत संतप्त भावना व्यक्त केल्या.
हैदराबाद येथील शमशाबादमध्ये एका 26 वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टर युवतीवर 4 नराधमांनी सामूहिक बलात्कार करत तिला जिवंत जाळले होते. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी अखिल भारतीय युवक महासंघाच्या वतीने जळगाव शहरातील कोर्ट चौकाजवळ निदर्शने करण्यात आली. यावेळी चारही आरोपींची छायाचित्रे असलेल्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. देशात महिलांवर होणारे अत्याचार वाढले असून ही परिस्थिती बदलण्यासाठी उपाययोजना कराव्यात, या मागणीचे निवेदन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यानावे यावेळी प्रसिद्धीस देण्यात आले.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
- पशुवैद्यकीय डॉक्टर युवतीवर अत्याचार करणाऱ्या चौघांना फाशीची शिक्षा द्यावी.
- महिलांवरील अत्याचार कमी व्हावेत, समाजकंटकांना जरब बसावा म्हणून कठोर कायदे करावेत.
- संतप्त लोकभावना लक्षात घेता या प्रकरणात तातडीने निर्णय घेतले जावेत.
हेही वाचा - पंकजा-रोहिणी यांचा पराभव पक्षांतर्गत कारवायांमुळेच - एकनाथ खडसे