जळगाव - शहरातील शिवकॉलनी परिसरात राहणाऱ्या एका प्राध्यापकाने आजारपणाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. मुला-मुलीला बोलावून त्यांची भेट घेऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. किशोर यादवराव देशमुख (वय ५८, रा. शिवकॉलनी) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.
हेही वाचा- ऐन हिवाळ्यात मुंबईत पाऊस; अरबी समुद्रात घोंगावणार पवन आणि अम्फन चक्रीवादळे
शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स विभागात कार्यरत प्राध्यापक किशोर देशमुख हे पत्नी कुमूदिनी यांच्यासह शिवकॉलनीत राहत होते. देशमुख यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगा कुणाल हा मुंबईत इंडियन क्लिनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत आहे. तर मुलगी केतकी हिचा विवाह झाला असून ती अमेरिकेत वास्तव्यास आहे. दोन दिवसांपूर्वी देशमुख यांनी मुलगा कुणाल व मुलगी केतकी हिला जळगावात घरी बोलावून घेतले होते. ते बुधवारी रात्री घराच्या वरच्या मजल्यावर झोपले होते. गुरुवारी सकाळी पत्नी कुमुदिनी त्यांना उठविण्यास गेल्या असता, देशमुख यांनी साडीने गळफास घेतल्याचे आढळून आले. कुमुदिनी यांनी आरडाओरड केल्यानंतर मुलगा, मुलगी तसेच शेजारचे नागरिक धावून आले. देशमुख यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, मृत्यूपुर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहीली होती. त्यात त्यांनी मी आजाराला कंटाळून हे कृत्य करत असल्याचे लिहिले आहे. पोलिसांनी ती चिठ्ठी ताब्यात घेतली आहे.
पुढील वर्षी होणार होते सेवानिवृत्त-
प्राध्यापक देशमुख हे मूळ यावल तालुक्यातील नायगाव येथील रहिवासी होते. त्यांचे भाऊ मनोज व आई हे गावाकडे राहतात. देशमुख हे १९८७ पासून नूतन मराठा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून इलेक्ट्रॉनिक्स विभागात कार्यरत होते. जुलै २०२० मध्ये ते सेवानिवृत्त होणार होते. अत्यंत शांत स्वभावाचे तसेच कमी बोलणारे प्राध्यापक म्हणून देशमुख महाविद्यालयात परिचित होते. किमान कौशल्य समिती महाविद्यालयात तपासणीसाठी येणार असल्याने त्यासाठी तयारी सुरू होती. या तयारीत देशमुखही सहभागी होते. या घटनेमुळे देशमुख कुटुंबीयांना धक्का बसला असून त्यांनी जिल्हा रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला.