जळगाव - जिल्ह्यातील अमळनेर शहरात पॅरोलवर सुटलेल्या एका कैद्याची जमावाने हत्या केली आहे. ही घटना रात्री साडेआठच्या सुमारास अमळनेरमधील ख्वाजा नगरात घडली. राकेश वसंत चव्हाण असे हत्या झालेल्या कैद्याचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेला पूर्ववैमनस्याची किनार असल्याचा संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे.
राकेश चव्हाण हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी अशा स्वरुपाचे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कारागृहातील कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे राकेश याची जळगाव कारागृहातून पॅरोलवर सुटका झाली होती. 2 दिवसांपूर्वीच तो अमळनेरमध्ये आला होता. रात्री तो ख्वाजा नगरात आला होता. तेथे दारूच्या नशेत त्याने काही लोकांशी वाद घातला. यावेळी त्याने दगडफेकही केली होती. हा वाद विकोपाला गेल्याने 6 ते 7 जणांच्या जमावाने त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीत लाकडी दांडक्याने डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अमळनेर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या रेकॉर्डवरील होता गुन्हेगार -
काही दिवसांपूर्वी राकेश चव्हाण याने अमळनेर लोहमार्ग पोलीस चौकीवर हल्ला करून काही वाहने आणि पोलीस चौकीचे नुकसान केले होते. शिवाय भुसावळ येथे गावठी बंदुकीसह पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली होती. अमळनेरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांनी त्याला भुसावळ येथून अटक केली होती. सराईत गुन्हेगार असलेल्या राकेशवर अमळनेर पोलीस ठाण्यासह भुसावळ, नंदुरबार पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल होते. दरम्यान, रेल्वेतही त्याने अनेक गुन्हे केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा प्राथमिक पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.