जळगाव - जिल्हा रुग्णालयाचा गलथानपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचारी पीपीई किट व इतर सुरक्षेची साधने वापरानंतर सर्रासपणे उघड्यावर फेकून देत आहेत. या साहित्याच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता आहे, असे प्रकार सातत्याने समोर येत असताना प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने फैलावत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही तीन हजारांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे विशेष कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. याठिकाणी केवळ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र, कोविड रुग्णालय प्रशासन कोरोनाच्या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. येथील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांविषयी सातत्याने तक्रारी समोर येत आहेत. कोविड रुग्णालयात कार्यरत असलेले डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफमधील कर्मचारी आपल्या अंगावरील पीपीई किट तसेच इतर सुरक्षेची साधने वापरानंतर सर्रासपणे उघड्यावर फेकून देत आहेत.
रुग्णालयातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेच्या शेजारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची जुनी शासकीय निवासस्थाने आहेत. ही निवासस्थाने मोडकळीस आली आहेत. याच ठिकाणी काही डॉक्टर्स व कर्मचारी पीपीई किट तसेच इतर सुरक्षेची साधने वापरानंतर फेकून देत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या देखील आढळल्या आहेत. या प्रकारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी हा प्रकार उघडकीस आणला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीपीई किट, फेस मास्क, हॅन्डग्लोव्हज्, एन-95 मास्क या सुरक्षा साधनांचा वापर झाल्यानंतर त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन होणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने त्याबाबत काही निर्देशही दिले आहेत. मात्र, कोविड रुग्णालयात त्याचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. शासकीय निवासस्थानांमध्ये फेकलेल्या साहित्यात पावसाचे पाणी साचल्याने साथीचे रोग पसरण्याची भीती आहे.
कोविड रुग्णालयात स्वच्छेतेच्या बाबतीत दुर्लक्ष होत आहे. यापूर्वीही अनेक गैरप्रकार उघडकीस आले आहेत तरीही प्रशासन जागे झालेले नाही. कोविड रुग्णालयाच्या स्वच्छतेसह इतर सर्व बाबतीत ऑडिट झाले पाहिजे, अशी मागणीही प्रतिभा शिंदे यांनी केली. या संदर्भात त्यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आणि जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार केली आहे. आता प्रशासन काय उपाययोजना करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.