जळगाव -लॉकडाऊनमुळे उपासमारीने होरपळलेले शेकडो परप्रांतीय मजूर, कामगार आता घराकडे परतत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प असल्याने अनेक जण सहकुटुंब पायीच घरी जात आहेत. 43 ते 44 अंश सेल्सिअस इतक्या तापमानातही घराच्या ओढीने त्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. कुणाच्या डोक्यावर ओझे, तर कुणाच्या कडेवर तान्हुले बाळ... पोटात अन्नाचा कण असो वा नसो, पाय चालतील तोपर्यंत वाट तुडवणारे लोक सध्या महामार्गावर ठिकठिकाणी नजरेस पडत आहे.
कोरोनाच्या नियंत्रणासाठी लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे कामधंदा नसल्याने मुंबई, पुणे, नाशिक, सुरत, अहमदाबाद यासारख्या महानगरांमध्ये उदरनिर्वाहासाठी गेलेल्या श्रमिकांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कामधंदा पुन्हा कधी सुरू होईल? याची शाश्वती नसल्याने शेकडो परप्रांतीय मजूर, कामगार आपल्या कुटुंबीयांना सोबत घेऊन पायीच घराकडे निघाले आहेत. प्रचंड हालअपेष्टा सहन करत त्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. एकेका कुटुंबात पती-पत्नी, म्हातारे आई-वडील, लहान लहान मुले मिळून 5 ते 6 जण किंवा त्यापेक्षा अधिक लोक असल्याचे पाहायला मिळत आहे. शेकडो किलोमीटर अंतर पायी चालून घरी जायचेच आहे, हाच निश्चय करून ते मार्गक्रमण करत आहेत. पाय थकले की मिळेल तेथे आसरा घ्यायचा, कोणी खायला दिले तर ते घ्यायचे नाही, तर उपाशी पोटीच नैराश्येला बाजूला सारत पुढच्या प्रवासाला लागायचे, असा त्यांचा दिनक्रम ठरलेला आहे. जीवाची पर्वा न करता अनेक जण प्रवास करत आहेत. मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी प्रत्येक शहरात, महानगरात अनेक दानशूर, सेवाभावी संस्था, संघटना पुढे आल्या. मात्र, जसजसा लॉकडाऊन पुढे वाढू लागला तसतसा मदतीचा ओघही कमी होऊ लागला. परिणामी, उपासमारी वाढू लागली. अशा विपरीत परिस्थितीत राहणं शक्य नसल्याने हातावर पोट असणाऱ्या कामगार आणि मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे.
सायकलीवरून घरी निघाले परप्रांतीय मजूर-
सुरत येथील लूम मार्केटमध्ये काम करणारे 8 ते 10 कामगार सायकलीवरून उत्तरप्रदेशात जाण्यासाठी निघाले आहेत. 5 ते 6 दिवसात साडेतीनशे ते चारशे किलोमीटर अंतर चालून आल्यानंतर ते शुक्रवारी जळगावात पोहचले होते. 20 ते 25 किलोमीटर अंतरापर्यंत सलग सायकल चालवणे, त्यानंतर थोडं थांबायचे... पुन्हा प्रवासाला सुरुवात करायची, असा त्यांचा प्रवास सुरू आहे. रस्त्यात सेवाभावी संस्था, संघटनांकडून मिळणारी मदत त्यांच्यासाठी संजीवनी ठरत आहे. अनेक जण हिरीरीने मदत करतात. अन्न-पाण्याची सोय करतात. या सेवाभावाची आठवण घेऊन ते पुढील प्रवासाला निघतात. प्रवासात एखाद्या सहकाऱ्याची सायकल पंक्चर होते, एखादा लवकर दमतो, अशा वेळी एकमेकांना मदत म्हणून सर्व जण सोबत प्रवास करतो. लॉकडाऊनमुळे जगणं असह्य झाले आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया परप्रांतीय कामगार मुन्ना तिवारी आणि सुनील यादव यांनी बोलताना दिली.