जळगाव - गस्तीवर असलेल्या पोलीस निरीक्षकाने रात्रीच्या वेळी संशयितपणे फिरणाऱ्या एका कारचा पाठलाग केल्यानंतर चालकाने कार सोडून पळ काढला होता. या कारमधून ८८ हजार ३०० रुपयांचा मद्याचा साठा मिळून आला आहेत. जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी पहाटे ३.३० वाजता ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षकाच्या समयसूचकतेमुळे ही कारवाई होऊ शकली आहे.
शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे यांना शनिवारी रात्री शहर विभागात नाईट राऊंड होता. ससे हे वाहनचालक अखलाख शेख व सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील यांच्यासोबत रात्री शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन आढावा घेत होते. रविवारी पहाटे ३.३० वाजता ससे यांचे वाहन नेरीनाका परिसरात आल्यानंतर एमएच १९ एएक्स ६६०८ क्रमांकाची कार संशयितपणे समोरुन जात होती. पोलिसांची गाडी पाहून कारचालकाने वेग वाढवून पांडे चौकाच्या दिशेने पळ काढला. हे पाहून ससे यांनीदेखील वाहनाने त्या कारचा पाठलाग केला.
कारचानकाने पांडे चौकातून, एमएसईबी ऑफिस व कोंबडी बाजारच्या शेजारच्या गल्लीत कार पळवली. तेथे एक तरुण भररस्त्यात खाटेवर झोपलेला असल्यामुळे कार पुढे घेऊन जाता आली नाही. अखेर कारचालकाने पोलिसांचे वाहन येण्याच्या आत कारमधून बाहेर पडून पळ काढला. पोलीस कारजवळ पोहोचले तेव्हा कारचे सर्व लाईट्स सुरू होते. यानंतर कारची तपासणी केली असता, त्यात पोत्यांमध्ये मद्याच्या बाटल्या असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ही कार जप्त करून पोलीस ठाण्यात आणली. रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत संपूर्ण मद्यसाठा तपासून मोजण्यात आला. या कारमधून ८८ हजार ३०० रुपये किमतीच्या मद्याच्या बाटल्या मिळून आल्या आहेत. तर ६५ हजार रुपयांची कारही पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस निरीक्षक ससे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात कारचालक, मालकाविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.