जळगाव - घरकुल घोटाळ्याचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलीस अधिकाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याची घटना धुळे जिल्हा न्यायालयात घडली आहे. या घटनेनंतर पत्रकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांची भेट घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत विश्वास पांढरे यांना निवेदनही देण्यात आले आहे.
धुळे जिल्हा न्यायालयात ७ जूनला जळगाव घरकुल घोटाळ्याचा निकाल जाहीर केला जाणार होता. या निकालाचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकार जिल्हा न्यायालयात गेले होते. त्यावेळी याठिकाणी कार्यकर्त्यांची देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यावेळी वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना पोलीस अधिकाऱ्यांनी धक्काबुक्की करत अर्वाच्य भाषा वापरली.
खासगी वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांची कॉलर पकडून खडसे नामक पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना धक्काबुक्की केली. या घटनेनंतर पत्रकारांनी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांची भेट घेऊन झालेला प्रकार सांगितला. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली. या पोलीस अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी दिले आहेत.