जळगाव - पोलीस दलाची शिस्तभंग केल्याने मालेगाव येथे कोरोना बंदोबस्तावर असलेल्या पारोळा पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी बडतर्फ केले आहे. पंकज मकराम राठोड असे बडतर्फ केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पंकज याने नाशिक जिल्ह्यातून प्रसिद्ध होणाऱ्या एका दैनिकाच्या बातमीदाराला पोलिसांविषयीची माहिती पुरवून पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का पोहचेल, अशी बातमी प्रसिद्ध करवून आणली होती. त्यामुळे अधीक्षकांनी ही कारवाई केली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव पोलीस दलातील काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे बंदोबस्तासाठी 13 एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे गेलेले आहेत. पंकज राठोड याचा देखील त्यात समावेश आहे. त्याने नाशिक जिल्ह्यातून प्रसिद्ध होणाऱ्या एका दैनिकाच्या बातमीदाराला पोलिसांविषयीची माहिती पुरवून पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का पोहचेल, अशी बातमी 1 मे रोजी प्रसिद्ध करवून आणली होती. 'मालेगाव येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे हाल', 'जळगाव पोलिसांचा संताप', 'मालेगाव येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर', असा त्या बातमीचा अन्वयार्थ होता.
नाशिक ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती. त्याची सखोल चौकशी करून तसा अहवाल जळगाव पोलीस अधीक्षक यांना सादर केला होता. प्राप्त अहवालानुसार, पंकज याने पोलीस दलाची शिस्तभंग करून पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेऊन पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगलेंनी त्याच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे.