जळगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात जिल्हाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीला मनाई आहे. असे असताना बेकायदेशीरपणे २६ प्रवाशांची वाहतूक करत असलेला ट्रक एमआयडीसी पोलिसांनी अजिंठा चौफुली परिसरात पकडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातील मुकटी येथून याकुब गयासुद्दीन पटेल (वय ३४, रा. वाघोदा खुर्द सावदा ता. रावेर) हा त्याच्या ताब्यातील ट्रकमध्ये (एमएच ०४ इवाय ५६१५) विनापरवाना २६ प्रवाश्यांची वाहतूक करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने अजिंठा चौफुलीवर कारवाई करत ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले. ट्रकमधील प्रवासी हे मजूर आहेत. धुळे जिल्ह्यातील मुकटी येथून मध्य प्रदेशाकडे जात होते. जिल्ह्यासह राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव कमी व्हावा, यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या असताना आयशर ट्रकचालक बेकायदेशीरपणे २६ प्रवाश्यांना ट्रक मधून मध्यप्रदेशाकडे घेवून जात होता. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पो. कॉ. गोविंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात आयशर ट्रकचालक याकुब पटेल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवाशांची तपासणी; निवासाची व्यवस्था
ट्रकमधील प्रवाशांना देखील एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यानंतर राधाकृष्ण मंगल कार्यालयात सर्वांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.