जळगाव - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका अट्टल दुचाकी चोरट्यास अटक केली आहे. मौजमजा करण्यासाठी तो दुचाकी चोरी करत होता. पारदर्शी उल्हास पाटील (वय 20, रा. पिंपळगाव बुद्रुक, ता. जामनेर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीच्या 15 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
सापळा रचला आणि चोरटा जाळ्यात-
जळगाव शहरात सातत्याने दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. याच पार्श्वभूमीवर, जामनेर तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील पारदर्शी पाटील हा तरुण जळगाव शहरात येवून दुचाकी चोरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांच्या पथकाने सापळा रचला होता. आज (गुरुवारी) पारदर्शी पोलिसांच्या हाती आला.
15 गुन्ह्यांची झाली उकल -
पारदर्शी पाटील याला अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून 6, जिल्हापेठ पोलीस ठाणे हद्दीतून 7, जळगाव शहर व शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीतून प्रत्येकी 1 अशाप्रकारे त्याने शहरातून 15 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याने चोरलेल्या सर्व दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.