जळगाव- अनैतिक प्रेमसंबंधातून एका तरुणाचा चाकूने भोसकून निर्घृणपणे खून झाल्याची घटना जळगावात घडली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील मेहरूण परिसरातील स्मशानभूमीजवळ ही घटना घडली. अंकुश उर्फ बबलु नाना हटकर (वय ३५, रा. रामबाबा कुटीया, तांबापुरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी संशयित आरोपी सुभाष निंबा मिस्तरी (रा. रेणुकानगर, मेहरूण) याला अटक केलीय. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकुश हा एका खासगी व्यक्तीकडे वाहनचालक म्हणून काम करीत होता. त्याचे एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. त्याच महिलेशी सुभाष मिस्तरी याचे देखील प्रेमसंबंध होते. सुभाष हा पूर्वी अंकुश याच्या घराच्याच शेजारी राहत असल्याने दोघांमध्ये ओळख होती. चार वर्षांपूर्वी तो रेणुका नगरात वास्तव्याला गेला होता. या महिलेला तीन मुले असून पतीने तिला सोडून दिले आहे. अंकुश आणि सुभाष याच्याशीही तिचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे सुभाष व अंकुश दोघांमध्ये वितुष्ट होते.
बुधवारी सायंकाळी अंकुश प्रेयसीच्या घरी गेला असता तेथे आधीच सुभाष आलेला होता. त्याला पाहून अंकुश संतापात बाहेर निघाला. दुसरीकडे अंकुशला पाहून सुभाषचा देखील संताप झाला.
प्रेयसीच्या घरात एकाचवेळी दोन्ही प्रियकर समोरासमोर आल्याने दोघेही संतापले होते. याच रागातून सुभाष याने अंकुश याला रात्री फोन करुन मेहरूण उद्यानात बोलावले. दोघांचा मित्र असलेला अजीज हमीद तडवी हा रात्री १० वाजता अंकुशच्या घरी गेला. अंकुश घरी आहे का? म्हणून त्याने त्याच्या आईकडे विचारणा केली. तेव्हा घरातून बाहेर येत अंकुश अजीजसोबत दुचाकीवर बसून बाहेर गेला. त्यावेळी सुभाष देखील काही अंतरावर थांबलेला होता. दोघांच्या मागे सुभाष देखील निघाला.
मेहरूण उद्यानात स्मशानभूमीजवळ वडाच्या झाडाजवळ प्रेमसंबंधावरून दोघांमध्ये वाद झाला.यावेळी सुभाष याने अंकुशच्या छातीत चाकूने वार केले. अंकुशवर प्राणघातक हल्ला झाल्याने घाबरलेल्या अजीज याने दुचाकीवरुन बसवून अंकुशला एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला मात्र, कस्तुरी हॉटेलजवळ अंकुश बेशुद्ध होऊन कोसळला. त्यामुळे अजीज याने इतर लोकांच्या मदतीने अंकुशला रिक्षातून जिल्हा रुग्णालयात रवाना केले आणि अजीज तसाच अंकुशच्या घरी गेला व त्याच्या आईला घटनेची माहिती दिली. दोघांनी जिल्हा रुग्णालय गाठले असता अंकुश हा मृत झालेला होता.
याप्रकरणी अंकुशची आई अरुणाबाई हटकर यांच्या फिर्यादीवरुन सुभाषविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सुभाष याची माहिती काढली असता, तो तांबापुरातील एका घरात बाहेरून कुलूप लावून झोपल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी तेथे जावून त्याला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली देत कारण स्पष्ट केले.